अल्पसंख्यांना भडकविण्यासाठी सोशल साईट्सचा वापर

मुंबई: अल्पसंख्य समाजाला भडकविण्यासाठी सोशल नेटवर्कींग साईट्सच्या माध्यमातून बनावट छायाचित्रांचा वापर केला जात असल्याचे पुरावेच एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांना सादर केले आहेत. विशेष म्हणजे अल्पसंख्यांकांच्या कत्तलीची म्हणून प्रत्यक्षात नैसर्गिक आपत्तीतील बळींची छायाचित्रे दाखविली जात आहेत.

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिंसाचारापूर्वी सोशल नेटवर्किंग साईट्सवर आसाम आणि म्यानमार येथे अल्पसंख्य समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली.

प्रत्यक्षात ही छायाचित्र तिबेट, चीन आणि थायलंड येथील नैसर्गिक आपत्तीच्या काळात पडलेल्या बळींची असून त्यावर संगणकीय संस्करण करून ही अल्पसंख्य समाजाच्या खुलेआम कत्तलीची छायाचित्र असल्याचे पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार अहमद फराज यांनी आपल्या ब्लॉगद्वारे उघडकीला आणले आहे.

या ब्लॉगच्या प्रती सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका तिस्ता सेटलवाड यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत.

Leave a Comment