कोलकाता: अनेक खटल्यांच्या बाबतीत न्यायालयाचे निकाल पाहता न्यायालयाने पैसे खाउन निकाल घेतल्याचे लक्षात येते; अशी मल्लीनाथी करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणखी एक वादळ अंगावर ओढवून घेतले आहे. त्यांच्या या विधानावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्याबद्दल ३ आठवड्यात निर्णय होणार आहे.
ममता यांनी दि. १४ ओगस्ट रोजी पश्चिम बंगाल विधानसभेच्या एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले. या विधानाबाबत आपल्याला खटल्याला तोंड द्यावे लागेल याची जाणीव असून याबाबत प्रसंगी तुरुंगात जाण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अॅड. विकास भट्टाचार्य या वकिलांनी ममता यांचे हे विधान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या विधानाच्या बातमीचे प्रसारण करणार्या दोन वृत्तवाहिन्या आणि एका वृत्तपत्राला खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यांच्या खुलाशानंतर अवमान याचिकेबाबत निर्णय घेतला जाईल.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणावर व्यक्तिश: आरोप केले नसून न्यायपालिकेचा पूर्ण आदर राखून एक सामान्य विधान केले आहे. त्यामुळे याबद्दल अवमानाचा खटला दाखल होऊ शकत नाही; असा दावा तृणमूल काँग्रेसचे पेशाने वकील असलेले एक आमदार कल्याण बेनार्जी यांनी केला आहे.