
मुंबई: स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रभाकर कुंटे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
कुंटे यांचा जन्म दि. ३ सप्टेंबर १९२० रोजी अलिबाग येथे झाला. वडीलांकडून त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. तरुणपणापासून कुंटे कॉंग्रेसमध्ये सक्रीय होते. अनेक कामगार चळवळींशी त्यांचा संबंध होता. कुंटे यांनी सन १९४२ च्या भारत छोडो चळवळीत भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही ते सहभागी झाले. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता.
मुंबईतील धारावी मतदारसंघातून कुंटे सन १९७२ मधे विधानसभेत निवडून गेले. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.