इस्लामाबाद: दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाक लष्कराने कडक पावले उचलली नाहीत तर देशात यादवी युद्धाचे संकट ओढविल्याखेरीज राहणार नाही; असा इशारा पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल अश्पाक परवेज कयानी यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याने पाक लष्कराच्या धोरणात मूलभूत बदल होण्याचे संकेत दिले आहेत.
काकुल सेना अकादमीत स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लष्करी संचलानानंतर ते बोलत होते.
दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानच्या भूमिका सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. याबद्दल संशय कायम राहिला तर राष्ट्रात दुफळी निर्माण होऊन त्याचे पर्यावसान यादवी युद्धात होईल; असे जनरल कयानी म्हणाले. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला ‘आपल्या’च लोकांविरुद्ध कठोर कारवाई करणे अनिवार्य असल्याचे सांगत जनरल कयानी यांनी पाकिस्तानच्या पर्वती भागातून कारवाया करणार्या अतिरेक्यांविरुद्ध आघाडी उघडण्याचे संकेतही दिले. कोणतेही राष्ट्र समांतर शासन यंत्रणा निर्माण होऊ देणार नाही; असे सांगत त्यांनी दहशतवाद विरोधी लढाईच्या यशासाठी प्रभावी कायदे आणि जनतेच्या सहभागाची आवश्यकता प्रतिपादन केली.
अर्थात जनरल कयानी यांच्या या विधानामागील बोलविता धनी अमेरिका आहे हे निश्चित! अमेरिकेचे संरक्षण मंत्री लिओन पेनेटा यांनी; पाकिस्तान दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांवर हल्ले करण्यास तयार असल्याचे विधान नुकतेच केले. त्याचप्रमाणे पाक गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख जहीर उल इस्लाम यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. यावेळी दहशतवाद्यांच्या हक्कानी गटाविरुद्ध अमेरिका आणि पाकिस्तानच्या संयुक्त कारवाईबाबत चर्चा झाली. या घटनाक्रमावरून पाकिस्तानच्या बदलत्या भूमिकेची मुळे अमेरिकेच्या कानपिचक्यात असल्याचे स्पष्ट होते.