देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा भाजप-सेनेकडून निषेध

जळगाव: कोट्यावधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यातील आरोपी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या महिला आघाडीने केला. अखेर या महिलांना अटक करून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जळगावचे पालकमंत्री असलेले देवकर नगराध्यक्ष असताना घडलेल्या सुमारे २९ कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळा खटल्यात आरोपी आहेत. एका आरोपीच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये; अशी मागणी जिल्ह्यातील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी शिवसेना महिला शाखेच्या वतीने कार्यकर्त्यांनी देवकर यांच्या घरासमोर निदर्शने करून त्यांना काळे झेंडे दाखविले. त्यामुळे पालकमंत्र्यांना ध्वजवंदनाच्या शासकीय कार्यक्रमासाठी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले. अखेर पोलिसांनी या ३९ महिलांना अटक केली. बंदोबस्तातच देवकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडताच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात देवकरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. महिला कार्यकर्त्यांना अटक केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचाही निषेध केला.

देवकर यांच्या घरासमोर निदर्शने करणार्‍या महिला कार्यकर्त्यांना उद्देशून देवकर यांनी अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करून शिवसेनेच्या महिला आघाडीने देवकर यांच्यावर महिलांच्या अवमानाचा गुन्हा दाखल करावा; अशी मागणीही केली.

Leave a Comment