एकत्र कुटुंबाची साडेसातशे वर्षांची परंपरा!

मंगळूर, दि.१५ ऑगस्ट – आजच्या धकाधकीच्या जीवनात एकत्र कुटुंब पद्धत हळूहळू मागे पडून विभक्त कुटुंबाकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र, येथील राजा कुटुंबीयाने तब्बल साडेसातशे वर्षांपासून एकत्र कुटुंबाची परंपरा जतन ठेवल्याचे आजही दिसून येत आहे. आज १३५ जण मोठ्या आनंदाने एकत्र राहत आहेत. हे सर्वजण एकाच इमारतीमधील ३० खोल्यांमध्ये राहत आहेत. 

रविवर्मा नरसिंहा राजा (१८७३-१९३४) यांना सहा मुले होती. सर्वमुलांसह ते एकत्र राहत होते. रविवर्मा यांनी सर्वांना एकत्र राहण्याचे एक प्रकारचे ’आदेश’च दिले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत परंपरा चालू आहे. कुटुंबामध्ये स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. मात्र, सण-समारंभ असल्यास सर्वजण एकत्रच भोजन करतात. कुटुंबामध्ये जनार्दन (वय ७९) हे सर्वांत वृद्ध सदस्य आहेत. एवढेजण एकत्र राहत असूनही, मोठे भांडण झाले नसल्याचे जनार्दन सांगतात. 

एकत्र कुटुंबामध्ये राहत असल्याने मुलांवर चांगले संस्कार होत आहेत, त्यामुळेच आमची परंपरा पुढे सुरू आहे. एकत्र कुटुंबामध्ये राहत असल्याचा सर्वांना अभिमान आहे, असेही जनार्दन यांनी सांगितले.