भारतीय अर्थव्यवस्था लवकरच बाळसे धरेल: पंतप्रधान

नवी दिल्ली: जगभर आलेल्या मंदीच्या लाटेची झळ भारतीय अर्थव्यवस्थेलाही पोहोचली आहे. मात्र सध्याच्या पेचप्रसंगातून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करीत असून लवकरच भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा बाळसे धरेल; असा विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.

भारताच्या ६६ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून ध्वजवंदन केले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाच्या विस्तृत भाषणात त्यांनी भारतीय जनतेला संबोधित केले.

भारतीय शेतकऱ्यांच्या श्रमातून देश अन्न धान्याबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. त्यांच्यामुळेच देशातील धान्याची कोठारे काठोकाठ भरलेली आहेत; असे नमूद करीत पंतप्रधानांनी शेतकर्‍यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. कृषीक्षेत्रात देशाने दरवर्षी ३.३ टक्के दराने विकास केला आहे. शेतीला आणि खेड्यांना अधिकाधिक वीजपुरवठा करण्यासाठी देशाच्या विद्युतनिर्मितीत मोठी वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

भारत पोलिओमुक्त देशांच्या यादीत जाऊन बसने अभिमानास्पद असून अनेक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून हे उद्दिष्ट साधणे शक्य झाल्याचे मनमोहन सिंग यांनी नमूद केले.

देशातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय कौशल्य विकासाचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत ८ कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल; असे सिंग यांनी सांगितले. शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी देशातील प्रत्येक कुटुंबाचे एक बँक खाते उघडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment