पुण्यातील घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ

पुणे दि.१४- देशात घरांच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात म्हणजे एप्रिल ते जून या काळात सर्वाधिक वाढ पुण्यात नोंदविली गेली असून ही वाढ १०.५ टक्के इतकी असल्याचे नॅशनल हौसिंग बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  नॅशनल हौसिग बँकेच्या रेसिडेक्स या उपक्रमाअंतर्गत २००७ पासून देशातील विविध शहरातील निवासी जागांच्या किमतीबाबत माहिती गोळा करण्यात येते आणि सध्या ही सेवा २० शहरांसाठी देण्यात येत आहे. दर तीन महिन्यांनी निवासी जागांच्या किमतींचा आढावा यात घेण्यात येतो.

बँकेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात गेल्या तीन महिन्यात निवासी जागांचे दर १०.५ टक्कयांनी वाढले असून त्याखालोखाल बंगलोरचा नंबर आहे. देशभरात सोळा शहरात जागांचे दर वाढले आहेत तर तीन शहरांत ते कांहीसे कमी झाले आहेत. सर्वाधिक महाग शहर म्हणून नोंद असलेल्या मुंबईत जागांचे दर ३.७ टक्क्यांनीच वाढले आहेत. बंगलोरमध्ये ही वाढ ८.७,पटना ८.६ , अहमदाबाद ६.४, लुधियाना ५.३ ,लखनौ ४.१ अशी आहे. दिल्ली कोलकत्ता येथील वाढ २.६, भुवनेश्वर, भोपाळ व चेन्नई येथे १.७ ,सुरत,गुवाहाटी येथे १.२ तर विजयवाडा आणि कोची येथे १.१ अशी आहे.

जयपूर येथे जागांचे दर २.६, इंदोर २.४, तर हैद्राबाद येथे १ टक्कयांनी कमी झाले असल्याचेही या आकडेवारीतून दिसून आले आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. वर्मा यांच्यामते देशात बहुसंख्य ठिकाणी निवासी जागांचे दर स्थिर आहेत. ज्या ठिकाणी ते वाढले आहेत त्यामागे तेथील स्थानिक कारणे आहेत. जेथे पायाभूत सुविधा अथवा औद्योगिक वाढ व रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत तेथे दर वाढ झाली आहे.

Leave a Comment