उद्योजकता विकास

सध्याच्या काळामध्ये दुलर्क्षित राहिलेला परंतु तेवढाच महत्वाचा असलेला मनुष्यबळ क्षेत्रातला विषय म्हणजे उद्योजकता. उद्योजकता या विषयाचे अभ्यासक्रम सुरू करणार्‍या संस्था कमीच आहेत आणि त्यांच्या कडे सुद्धा पुरेशे अॅडमिशन्स् झालेले नाहीत. कारण या शास्त्रातली पदवी घेऊन बक्कळ पगाराची नोकरी मिळेलच याची शाश्वती कोणी देत नाही. आताही तशी देता येत नाही. परंतु येत्या दहा वर्षामध्ये उद्योजकता विषयक अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना भरपूर मागणी येणार आहे.

जमशेदपूर (झारखंड) येथील एक्सएलआरआय स्कूल ऑफ बिझनेस अॅन्ड ह्यूमन रिसोर्सेस या संस्थेने पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या स्वरुपात एक विशिष्ट अभ्यासक्रम विकसित केला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम फॉर सर्टिफिकेट इन एन्टर-प्रिमियरशीप मॅनेजमेंट असे अभ्यास-क्रमाचे नाव आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज भरल्यानंतर अशा उमेदवारांना तोंडी मुलाखत आणि गरज पडल्यास गटचर्चा यात भाग घ्यावा लागेल आणि त्यातून त्यांची निवड केली जाईल.

उद्योजकता ही देशाची संपत्ती असते आणि अनेक तरुणांच्यामध्ये उद्योजक प्रवृत्ती दडलेली असते. या प्रवृत्तीला प्रेरणा दिली तर त्या तरुणांमधून चांगला उद्योजक जन्माला येतो, जो पुढे चालून देशाच्या संपत्तीत भर घालू शकतो. म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या प्रेरणेतून विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून उद्योजकता विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये जमशेदपूरच्या संस्थेतला अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देऊ शकतात. इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा. चेअरमन, इडीसी, एक्सएलआरआय, जमशेदपूर पीन कोड ८३१०३५ फोन ०६५७-३९८३३३३ फॅक्स ०६५७-२२२७८१४. 

याच संस्थेच्या धर्तीवर अहमहाबादमध्ये एन्टरप्रिमिअरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेच्या मार्फत एक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या संस्थेतून उद्योजकता विकास विषयक एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. डिप्लोमा इन एन्टरप्रिमिअरशीप अॅन्ड बिझनेस मॅनेजमेंट (डीईबीएम) असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. या अभ्यास क्रमाचे एक वैशिष्ट्य असे की, दूर शिक्षण पद्धतीने सुद्धा त्याचे शिक्षण घेता येते. संस्थेतच गेले पाहिजे असे काही नाही. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असला तरी वर्षाच्या विविध चार महिन्यांमध्ये प्रवेश खुला असतो आणि ज्या महिन्यात प्रवेश घेतला जाईल त्या नंतरचे वर्षभर अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. म्हणजे एकाच वर्गाच्या चार बॅचेस आहेत आणि त्या जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर अशा चार वेळा सुरू होतात.

Leave a Comment