चोवीस तासात बांधा आलिशान घर

लग्न पाहावं करून आणि घर बघावे बांधून अशी आपल्याकडे म्हण आहे. याचा अर्थ असा की ही दोन कार्ये करताना नक्की काय काय अडचणी येतात हे सांगता येत नाही व त्यामुळे दरवेळी येणार्‍या नवीन अडचणींनी आपले अनुभव विश्व समृद्ध होत जाते. घरांच्या किंमती सध्या गगनाला गवसणी घालत आहेत. शिवाय घर बुक केल्यानंतर ते वेळेत मिळेल याची शाश्वती नाहीच. मात्र संशोधकांनी आता स्वस्तात मस्त आणि झटपट घर बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यामुळे केवळ २० तासांत अडीच हजार स्क्वेअर फुटाचे घर सर्व फिटिंग्जसह बांधणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे थ्रीडी प्रिटरच्या तंत्रज्ञानावरच हे नवे तंत्रज्ञान आधारलेले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातील संशोधक प्रो.बेहराख खोशन्वीस यांनी हे संशोधन केले आहे. ते सांगतात, कॉन्टूर क्राफ्टींग या तंत्रज्ञानामुळे हे शक्य असून त्यात थ्रीडी प्रिटर जसे प्रिटींग करताना एकावर एक प्लॅस्टीकचे थर देतो तसेच संपूर्ण घर कॉक्रीटचे थरावर थर देऊन बांधता येते. विशेष म्हणजे हे थर देतानाच प्लंबिग व इलेक्ट्रीकचे वायरिंग व सर्व फिटिंग्जही बसविता येतात. या पद्धतीने बांधलेल्या भिंती अतिशय बळकट असतातच पण त्यांना कमानदार आकार देऊन ही घरे सुंदर आणि आकर्षकही बनविता येतात. या बांधकामासाठी येणारा खर्च सध्याच्या बांधकामाच्या तुलनेत खूपच कमी आहे पण वेळेची बचतही मोठी असल्याने हा खर्च आणखी कमी होतो.

विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान वापरून परग्रहांवरही प्रयोगशाळा व अन्य बांधकामे करणे शक्य असल्याचा प्रोफेसरांचा दावा आहे. या तंत्रज्ञानावर दीर्घ काळ संशोधन केले गेले असून त्यामुळे सुरक्षित, खात्रीलायक आणि सहज परवडणारी घरे बांधता येणार आहेत.