रामदेवबाबांच्या आंदोलनाला रालोआचा पाठींबा

नवी दिल्ली,दि. १३ – योगगुरु रामदेव बाबा यांनी संसद मार्चची घोषणा करतानाच ’काँग्रेस हटाओ, देश बचाओ’ असा नारा दिल्यानंतर रालोआने त्यांना प्रतिसाद दिला. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि रालोआचे समन्वयक शरद यादव रामदेव बाबांच्या व्यासपीठावर पोहोचले. तेथुन त्यांनी सरकारवर हल्ला चढविला. तर शरद यादव यांनी अण्णा हजारेंनाही लक्ष्य केले. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी तसेच राजद या पक्षांनी रामदेव बाबांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. परंतु, काँग्रेसचा तिळपापड झाला आहे.

काँग्रेस- प्रवक्ते जनार्दन त्रिवेदी यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की, राजकारणात मुखवट्यांची चर्चा बरीच होते. आज देशाने मुखवटे कसे बदलतात आणि खरा चेहरा कसा समोर येतो, हे प्रत्यक्ष पाहिले. टीम अण्णावरही त्रिवेदी यांनी टीका केली.

समाजवादी पार्टी- पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी  काळ्या पैशाच्या मुद्यावरुन पाठींबा देताना जो कोणी काळा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करेल, सपाचा त्याला पाठींबा राहील. काळा पैसा देशात परत आला पाहिजे. काळा पैसा परत आल्यास देशाचे भले होईल असे सांगितले.

बसपच्या सुप्रिमो मायावती यांनी सांगितले की, भ्रष्टाचार आणि काळा पैसा अतिशय गंभीर मुद्दा आहे. आमच्या पक्षाने सुरुवातीपासून भ्रष्टाचाराचा विरोध केला आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊन मार्ग काढावा ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परदेशातील काळा पैसा देशात परत आला पाहिजे, यासाठी प्रयत्न झालेच पाहिजे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रपणे प्रयत्न करायला हवे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, काळ्या पैशाचा मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याविरोधात आपण लढले पाहिजे. रामदेव बाबा अतिशय योग्य कार्य करीत आहेत. नितीश कुमार यांनी अण्णा हजारे यांनाही समर्थन दिले. ते राजकीय पक्ष स्थापन करण्याची गोष्ट करीत आहेत. त्यात चुकीचे काय आहे?
सीपीआयचे ए. बी. बर्धन यांनीही रामदेव बाबांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे.

Leave a Comment