रझा अकादमी मोर्चास परवानगी का दिली ? -आमदार तावडे

पुणे,दि.१३ – ज्या संघटनेने यापूर्वी डेन्मार्क कार्टून व सलमान रश्दी प्रकरणी मोर्चे काढून पोलीसांवर व लोकांवर हिंसक हल्ले केले आहेत व त्यात पोलीसांना गोळीबार करावा लागला आहे, अशा रझा अॅकॅडमी संघटनेला मुंबईत मोर्चा काढायला का परवानगी दिली असा प्रश्न भाजपाच्या आमदारांनी आज पुण्यात राजभवनावर राज्यपाल शंकर नारायणन् यांना भेटून उपस्थित केला. या शिष्टमंडळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे, आमदार गिरीश बापट यांचेसह अन्य प्रतिनिधी हजर होते.

या चर्चेबाबत बोलताना श्री विनोद तावडे म्हणाले, रझा अॅकॅडमीचा मोर्चा हिंसक होण्याची शक्यता आहे याची कल्पना सोमवारी सकाळीच त्यात सहभागी झालेल्यांचे फेसबुकवरील निरोप व ट्वीटरवरील पत्रे पाहता आली होती. हे मोर्चेवाले जेंव्हा मानखुर्द गोवंडी, चेंबूरवरून निघाले तेंव्हा ते केवळ हॉकिस्टिक व सळ्या घेऊन नाही निघाले तर हार्बरच्या गाड्यात उतारुवर हल्ले करतच आले. पोलीसांना याची पूर्वसूचना मिळूनही त्यांनी त्यावर कारवाई केली नाही. येवढेच नव्हे तर अशी माहिती मिळत आहे की, काही पोलीस अधिकार्‍यांनी व सरकारातील लोकांनीही रझा अॅकॅडमीचा पूर्वेतिहास सांगून त्याला परवानगी देऊ नये असा आग्रह धरला होता पण एका मंत्र्याच्या दबावामुळे ही परवानगी द्यावी लागली. त्या मंत्र्याला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे.

यापूर्वीच्या मोर्चात दोन पोलीस व दोन नागरीक यांच्या हत्या झाल्या असल्याची पाश्र्वभूमी असतानाही पोलीसांनी परवानगी दिली त्या आयुक्तावर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे रझा अॅकॅडमीच्या पदाधिकार्‍यावर ‘खुनाचे प्रयत्न ’ या कलमाखाली खटले भरणे आवश्यक आहे.

राज्यपालांशी दुष्काळाबाबत झालेल्या चर्चेची माहिती सांगताना श्री तावडे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाचे स्वरुप उग्र आहे. पण पश्चिम महाराष्ट्रासाठी आलेला निधी दोन तीन मंत्री फक्त आपल्या मतदारसंघाकडे म्हणजे फलटण, कासेगाव, सोनसळ आणि तासगाव येथे वळवित आहेत.त्यामुळे जत, खटाव, माण आटपाडी हे पारंपारीक दुष्काळी तालुके कोरडेच राहात आहेत.  केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे त्यातून राष्ट्रवादीच्या भानगडीत अडकलेल्या बँकांच्या थकबाक्या भागवण्याची योजना पुढे आणली जात आहे.

शासनाने गेल्या महिन्यात जे दुष्काळासाठीचे २६८५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले ती मंत्रिमंडळाने केलेली जनतेच्या डोळ्यातील धूळफेक आहे., शेतीच्या विकासासाठी निरनिराळ्या खात्यात जो निधी पूर्वीच टाकण्यात आला तोच दुष्काळासाठी नवा मदतीचा हात असे भासवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. राज्यपालांनी आमची बाजू ऐकून घेतली व पुढच्या आठवड्यात यावर सर्व पक्षीय बैठक बोलावण्याचे त्यांनी ठरविले असल्याचे तावडे यांनी सांगितले.

Leave a Comment