भारत एकही सुवर्ण पदक न मिळवू शकलेल्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली, दि.१३ – लंडन ऑलिंपिकमध्ये सहा पदके जिंकून आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी तर केलीच; शिवाय एकही सुवर्ण पदक न मिळवू शकलेल्या देशांच्या यादीत पहिले स्थान मिळविले आहे.  

लंडन ऑलिंपिकमध्ये २०४ देशांनी भाग घेतला. यापैकी केवळ ८५ देशांना पदक मिळाले. अशाप्रकारे ११९ देशांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. या देशांत भारताचा शेजारी पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आदींचा समावेश आहे.

दक्षिण आशियाई देशांत भारत एकमेव असा देश राहिला ज्याने लंडन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकले. भारताला दोन रौप्य आणि चार कास्यासहित सहा पदके मिळाली. पदक तालिकेत तो ५५व्या स्थानी राहिला. मात्र किमान एक तरी सुवर्ण पदक मिळविलेल्या देशांच्या यादीतून बाजूला केले, तर फक्त रौप्य अथवा कांस्य पदक जिंकणार्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला आहे. 

अशा प्रकारच्या यादीत भारतानंतर मंगोलियाचा क्रमांक आहे.त्याने दोन रौप्य आणि तीन कांस्यासहित पाच पदके जिंकली. पदक तालिकेत सात देश असे आहेत ज्यांना केवळ एकच कांस्य पदक मिळाले, सहा देशांना केवळ रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर अल्जीरिया, बहामा, कॅनडा, युगांडा आणि व्हेनेजुएला एक-एक सुवर्ण पदक जिंकून भारताच्यावर संयुक्त ५०व्या स्थानी आहेत. 

Leave a Comment