शीखविरोधी आतंक

अमेरिकेच्या विस्कान्सीन सिटी या शहरातल्या गुरूद्वार्यात झालेला हल्ला धिक्कारार्ह आहे. या हल्ल्यात बळी पडलेले सात जण नेमके कशाचे बळी आहेत ? एखाद्या व्यक्तीच्या मनात शीख पंथाविषयी काही मत्सर असता आणि त्यापोटी त्याने या गुरुद्वार्यावर हल्ला केला असता, तर हे सात जण केवळ शीख आहेत म्हणून बळी पडले असे म्हटले गेले असते; पण त्यांचे बळी त्यासाठी गेलेले नाहीत. शीख लोक वापरत असलेली पगडी आणि त्यांची दाढी यामुळे ते अरब आहेत असे काही अतिरेकी प्रवृत्तीच्या अमेरिकी लोकांना वाटते आणि ते अरब समजून शीखांच्या हत्या करीत आहेत, त्यांच्यावर हल्ले करीत आहेत आणि जमेल तेथे हिणकस वागणूक देत आहेत. म्हणजे या शीखांचा दोष काय तर ते अरब आहेत असे या माथेफिरू लोकांना वाटते.

मुळात ते तसे दिसत असते तरी या शीखांचे बळी केवळ अरबांसारख्या दिसण्यामुळे पडले आहेत असे समजता आले असते पण ते अरबांसारखे दिसत नाहीत.  काही अज्ञानी लोकांना तसे वाटते. म्हणजे काही माथेफिरू लोकांच्या अज्ञानामुळे या सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेतल्या लोकांचे हे अज्ञानही त्यांच्या आत्मकेद्रित वृत्तीतून निर्माण झाले आहे. कारण या लोकांना अमेरिकेच्या बाहेर काही जग आहे हेच मुळी माहीत नाही. आपला देश अमेरिका आणि त्या अमेरिकेचा स्वार्थ यापलीकडे काही पहायला ते तयारच नसतात. त्यामुळे त्यांना अरब काय आणि शीख काय सारखेच वाटतात. ते तसे सारखे नसताना त्यांना सारखे वाटतात हा त्यांच्या विकृतीचा भाग आहे. तिच्यामुळेच अमेरिका प्रचंड संपन्न  असूनही तिचे सामाजिक जीवन पूर्णपणे हिंसाचार आणि रक्तपात यांनी भरून गेलेले आहे. गेल्याच आठवड्यात अशाच एका प्रकारात कोलॅरेडो शहरामध्ये एका माथेफिरू तरुणाने एका चित्रपटगृहात मन मानेल तसा गोळीबार केला आणि तब्बल १५ जणांचे बळी घेतले.

अमेरिकेत लोकांना मुक्तपणे बंदुकीचे परवाने दिलेले असतात. देश आणि समाज यांच्यापेक्षा व्यक्ती आणि तिचे स्वातंत्र्य मोलाचे आहे असा विचार तिथे सांगितला जात असतो. बंदुकीचे परवाने हा अशाच व्यक्ती स्वातंत्र्याच्या फाजिलपणातून निर्माण झालेला प्रकार आहे. २००७ साली व्हर्जिनियामध्ये स्युंग हुई चो या नावाच्या एका तरुणाने भर बाजारामध्ये असाच स्वैर गोळीबार करून ३२ जणांचे बळी घेतले होते. त्यामुळेच अमेरिकेत सध्या गन कल्चर हा चर्चेचा विषय झालेला आहे. अमेरिकेतल्या गुन्हेगारी विषयक सरकारी अहवालामध्ये याबाबत इशारा देण्यात आलेला आहे. युनिफॉर्म क्राईम रिपोर्ट असे शीर्षक असलेला हा अहवाल प्रशासनाला २०१० मध्ये सादर करण्यात आला आहे. अमेरिकेत झालेल्या हिंसाचारात ६७ टक्के लोकांचे प्राण वैयक्तिक बंदुकधारी लोकांच्या गोळीबारात गेलेले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. ही आकडेवारी आणि हे प्रमाण डोके चक्रावून टाकणारे आहे. काल झालेला गोळीबार एका माथेफिरूने केलेला आहे. परंतु त्या मागे एक मूर्खपणाचे का होईना तत्वज्ञान आहे. ते वंशविद्वेषाचे तत्त्वज्ञान आहे. अमेरिकेतील शिखांच्या शीख कोईलिशन या संघटनेने २००१ सालपासून शिखांवर झालेल्या अशा चुकीच्या हल्ल्यांची नोंद केली आहे आणि गेल्या अकरा वर्षात अमेरिकेत शिखांच्या हत्या, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांना धक्काबुक्की करणे, धमकावणे, मारणे असे ७०० प्रकार झाले असल्याचे म्हटले आहे.

दुसरी एक संघटना म्हणजे रियल शिखीझम याही संघटनेने अशाच प्रकारे नोंद केली असून असे हजार प्रकार घडल्याचे म्हटले आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणार्या अमेरिकेत हा वंशविद्वेष जागा आहे आणि तो अनेकांसाठी धोकादायक आहे. २००१ सालपासून या प्रवृत्तीने शीख लोकांचे जीवन तर फार जोखमीचे बनले आहे. विस्कॉन्सीन सिटीतील हा प्रकार घडल्यापासून सार्या जगातल्या शिखांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे. अमेरिकेत शिखांची संख्या मोठी आहे. त्यांचे अमेरिकेच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. अमेरिकेच्या दोन राज्यात शिखांची संख्या एवढी मोठी आहे की, त्यातल्या एका राज्यात पंजाबी भाषेला अधिकृत सरकारी भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आणि एका राज्यात त्या बाबत विचार सुरू आहे. एवढे असूनही शिखांच्या विषयी तिथल्या अतिरेक्यांच्या मनामध्ये चीड असावी ही दुर्दैवाची बाब आहे.  

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला आहे. पण तो तोंडदेखलेपणाचा आहे कारण अमेरिकेला भारतीयांचे जीव अमेरिकी लोकांएवढे मोलाचे वाटत नाहीत. अमेरिकेतल्या लोकांचे प्राण किंमती असतात म्हणून त्यांच्यासाठी जगातल्या अन्य कोणा लोकांचे जीव गेले तरी काही हरकत नाही, असे अमेरिकेचे वर्तन असते. ते बाकीच्या लोकांना य:कश्चित समजत असतात. भोपाळ मध्ये झालेल्या विषारी वायू कांडात हीच मनोवृत्ती प्रगट झालेली आहे. इराकमधील लोक असोत की अफगाणिस्तानातले असोत अमेरिकेच्या राजकीय स्वार्थासाठी काही लोक मरतात यात काहीच वावगे नाही असे अमेरिकेचे म्हणणे असते. म्हणून या सात जणांच्या मृत्यूच्या तपासातही हे सरकार फारसे गंभीर नाही.

 

 

 

 

Leave a Comment