राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा धोका

नवी दिल्ली: भारतात मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या लष्कर ए तैय्यबाने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ९/११ सारखा हल्ला घडविण्याचा कट रचल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्था ‘आयबी’ला मिळाली आहे. या हल्ल्यासाठी लष्करच्या महिला विभागाचा वापर करण्याची योजना असल्याचेही आयबीने सूचित केले आहे.

लष्कर ए तैय्यबाच्या महिला दहशतवादी प्रवासी म्हणून विमानात प्रवेश करतील आणि त्या विमानाचे अपहरण करतील. त्यांच्यामार्फत अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर करण्यात आलेल्या ९/११ च्या हल्ल्याच्या धर्तीवर राजधानी दिल्लीत हल्ला केला जाईल; अशी माहिती मिळाल्याचे आयबीच्या सूत्रांनी सांगितले.

आयबीच्या सूचनेनुसार राजधानीतील विमानतळावर सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. विमान अपहरण विरोधी पथकासह दोन श्वानपथके विमानतळावर तैनात करण्यात आली असून पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे.