मागविला टीव्हि निघाली रायफल

वॉशिंग्टन दि.११ – आजकाल ऑनलाइन खरेदीचे प्रस्थ फारच वाढत चालले आहे. तरुणाईला ही खरेदी सोयीची होतेही. मात्र नेहमीच्या दुकानात जाऊन खरेदी केलेल्या वस्तू ऐवजी दुसरीच वस्तू घरी आणण्यात भारतीयांचा हातखंडा आहे असा कोणाचा समाज असेल तर तो खरा नाही. अगदी ऑनलाइन खरेदी केल्यावरही आधुनिक, सुधारणावादी अमेरिकेतही असे प्रकार घडतात. उदाहरण द्यायचे तर  राजधानी वॉशिंग्टनमध्ये राहणार्‍या सेथ होरवित्झ याचा अनुभव वाचा. ऑनलाईन खरेदीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ऍमेझॉन डॉट कॉम या साईटवरुन सेथ यांनी एक दूरचित्रवाणी संच मागवला होता. या साईटकडून टीव्हीचे खोके मिळालेही, परंतु त्यामध्ये संचाऐवजी उच्च क्षमतेची निमस्वयंचलित रायफल मिळाल्याने होरवित्झ यांना आश्चर्याचा धक्काच बसला !

होरवित्झ यांना मिळालेल्या स्विस आर्म एजीने बनविलेल्या ’सिग सोर एसआयजी ७१६’ या रायफलची किंमत सुमारे २,००० डॉलर इतकी आहे. या प्रकारानंतर होरवित्झ यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. कारण होरवित्झ यांना मिळालेल्या या खोक्यावर त्यांचाच पत्ता असला, तरी खोक्याच्या आत असलेल्या बिलावर मात्र पेनसिल्व्हानियाच्या एका बंदुकीच्या दुकानाचा पत्ता होता.

पोलिसांची यासंदर्भात अधिक शोध घेत आहेत. या प्रकारची रायफल बाळगणे अथवा तिची एका राज्यातून दुसर्‍या राज्यात वाहतूक करणे अवैध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याआधी देखील या साईटवरुन एका विद्यार्थ्याने पुस्तक मागवले असता, त्याला कोकेनची थैली मिळाल्याचा प्रकार घडला होता. म्हणजे कुठेही जा पृथ्वी गोल आहे हेच खरे.

Leave a Comment