दंड भरा सांगणारा व्हायरस लुटतोय इंटरनेट ग्राहकांना

तुमचा पत्ता एफबीआय कडे नोंदला गेला आहे, तुम्ही बंदी असलेल्या चाईल्ड पोर्नसारख्या साईट पाहात असल्याची नोंद झाल्याने तुमचा संगणक बंद पडला आहे. तरी तो पुन्हा सुरू होण्यासाठी दंड भरा असा एफबीआयचा मेसेज अमेरिकेत आणि जगभरात अनेक इंटरनेट ग्राहकांना आला असून कित्येकांनी संगणक पुन्हा सुरू होण्यासाठी दोनशे डॉलर्सपर्यंत दंड भरलाही असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेतील इंटरनेट क्राईम रिपोर्ट सेंटरकडे या संबंधिच्या तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे. शेवटी एफबीआयने असा कोणताही संदेश आला तरी दंड भरू नका कारण हा एक प्रकारचा व्हायरसच असल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे.

इंटरनेट क्राईम रिपोर्ट सेंटर ही एफबीआय आणि नॅशनल व्हाईट कॉलर क्राईम सेंटर यांच्या भागीदारीतून २००० साली स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्या देना ग्रेगरी या मेसेजसंबंधी माहिती देताना म्हणाल्या की त्यांच्या संस्थेकडे अशा प्रकारे लुबाडल्या गेल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र हा व्हायरसच असून रेव्हेटन रॅनसोमवेअर असे त्याचे नांव आहे. मालवेअरमधूनच हा व्हायरस स्वतःला संगणकात घुसवतो आणि फेडरल कायदा मोडला असल्याचा संदेश युजरला देतो. त्यात एफबीआयने तुमची ओळख पटविली असल्याचे तो सांगतो आणि बंद पडलेले इंटरनेट पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कार्डच्या माध्यमातून दंड म्हणून पैसे भरण्याची सूचनाही देतो. केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात या विषाणूने धुमाकुळ घातला असल्याचे ग्रेगरी यांचे म्हणणे आहे. इंटरनेट बंद पडू नये म्हणून अनेक युजर्सनी दोनशे डॉलर्सपर्यंत हा तथाकथित दंड भरला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा व्हायरस एकदा संगणकात शिरला तर तो सहजासहजी काढता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा लोकांनी असा मेसेज आला तर निदान दंड तरी भरू नये व स्वतःची फसवणूक टाळावी असे आवाहन एफबीआयने इंटरनेट युजर्सना केले आहे.

Leave a Comment