अण्णांना टीमपासून फोडण्याचे कारस्थान: केजरीवाल

भ्रष्टाचाराच्या विरोधातील चळवळीचे राजकियीकरण करण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाच आहे. अण्णांवर टीम अण्णाने दबाव आणून हा निर्णय घोषित करणे भाग पाडले; अशा अर्थाचा प्रचार हा टीम अण्णा आणि अण्णा यांच्यात फूट पडण्याचे कारस्थान आहे; असा आरोप तत्कालीन टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला.

अण्णा हे राजकारण प्रवेशाच्या विरोधात असून त्यांच्यावर दबाव आणून राजकीय पर्याय उभा करण्याचा निर्णय जंतर मंतर येथे जाहीर करण्यात आला; अशा अर्थाची वृत्त टीम अण्णाच्या आंदोलनसमाप्तीनंतर प्रसिद्ध झाली होती. अण्णांनी राळेगण सिद्धी येथे परतल्यावर एकांतवासात जाणे पसंत केले. या पार्श्वभूमीवर या घोषणेबाबत संशय पसरण्यास अधिकच वाव मिळाला.

मात्र केजरीवाल यांनी ट्विटरवर या प्रचाराचा समाचार घेतला आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून आमच्यात विद्वेष पसरविण्याचा आणि फूट पाडण्याचा हा जुनाच डाव असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे. मात्र टीम अण्णाचा अण्णांवर आणि त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.