एक निरर्थक बंड

गुजरातेत नरेन्द्र मोदी यांच्या विरोधात केशुभाई पटेल यांनी बंड पुकारले असून, मोदींना हटवण्याची प्रतिज्ञा करून भाजपा बाहेर पडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यात त्यांना आणखी एक माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि कांशीराम राणा यांनी सहकार्य दिले आहे. अशा या तीन ज्येष्ठ नेत्यांनी सारी शक्ती एकवटून अहमदाबादेत एक मोठी जाहीर सभा घेण्याची घोषणा केली. तिच्यासाठी भरपूर जाहीरातबाजी केली. अशा या ऐतिहासिक सभेला लोक आहे ‘दोन हजार’.  

आंध्रात चिरंजीवी यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्यासाठी सहा लाखाची सभा घेतली होती पण त्यांचा पक्ष सहा महिने सुद्धा जिवंत राहिला नाही. यावरून चिरंजीवी यांच्या या बंडाचे भवितव्य काय असेल याचा निर्णय करता येईल. कारण गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाचा करिश्मा दाखवून वर्चस्व निर्माण केलेले आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आणि संघामध्ये मोदी यांचे अनेक शत्रू आहेत. अरुण जेटली, सुषमा स्वराज आदी मंडळी मोदींची स्तुती करताना हात आखडता घेतात पण आज त्यांच्याइतका लोकप्रिय नेता भाजपात कोणीच नाही. म्हणूनच नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे २०१४ सालच्या निवडणुकीतले पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. अमेरिकी लोकांच्या दृष्टीनेही हा विषय उत्सुकतेचा आहे. त्यामुळे टाईमसारख्या जगप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर मोदींची छबी झळकली. मात्र त्यांच्या या गवगव्यामुळे पक्षातल्या त्यांच्या विरोधातल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरते. अशा अस्वस्थ नेत्यांमध्ये केशुभाई पटेल हे नेहमीच आघाडीवर असतात. १९९५ साली केशुभाईंच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. नंतर १९९७ साली तिथे मध्यावधी निवडणुका झाल्या आणि त्यात सुद्धा भाजपालाच बहुमत मिळाले, तेही केशुभाईंच्या नेतृत्वाखालीच मिळाले. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना त्यांची टर्म पूर्ण करू दिली नाही. २००१ साली झालेल्या पक्षांतर्गत उलाढालीत केशुभाईंचा बळी दिला आणि त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. केशुभाईंच्या मनामध्ये या गोष्टीची रुखरुख आहे. केशुभाई हे कार्यक्षम मुख्यमंत्री होते. परंतु ते स्वभावाने फार सरळ आणि भोळसट आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांचा पाड लागत नाही. पक्षांतर्गत चढाओढीत सुद्धा ते मागे पडले आणि मोदींचा घोडा विनमध्ये आला.  तेव्हापासून केशुभाई तळमळत आहेत. २००२ साली गुजरातेत झालेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. त्या निवडणुकीत केशुभाई निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेच नव्हते. २००७ सालच्या निवडणुकीत मात्र ते उतरले आणि त्यांनी मोदींच्या विरुद्ध प्रचार केला. भारतीय जनता पार्टीच्या काही बंडखोर नेत्यांनी सरदार पटेल खेडुत उत्कर्ष समिती नावाची संघटना स्थापन केली आहे. तिच्या व्यासपीठावर केशुभाईंनी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचाराची तोफ डागली. तिचा फारसा उपयोग झाला नाही. आता गुजरात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि केशुभाई नेहमीप्रमाणे जागे झाले आहेत. केशुभाई एरवी पाच वर्षे शांत बसतात आणि निवडणुका आल्या की गडबड करायला लागतात. ते गुजरातच्या राजकारणातील सर्वाधिक प्रभावशाली समजल्या जाणार्या पटेल जातीचे आहेत. या जातीच्या मतदारांचे प्रमाण १८ टक्के एवढे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात ३६ आमदार आहेत. तेव्हा केशुभाई पटेल मैदानात उतरले की, राज्यातला पटेल समाज त्यांच्या मागे जाणार आणि नरेंद्र मोदींना धोका निर्माण होणार अशी चर्चा व्हायला लागते. तसाच प्रकार आता सुरू झाला आहे.

निवडणुकीचे वेध लागले की, केशुभाई पटेल यांनी काही ठिकाणी सभा घेऊन मोदीविरोधी राळ उडवायला सुरुवात केली आहे. खरे म्हणजे केशुभाई मैदानात उतरले की साराच्या सारा पटेल समाज त्यांच्यामागे एकमुखाने उभा राहणार, असे कधी घडत नाही. या समाजातले अनेक नेते भाजपामध्ये वरच्या स्तरावर आहेत आणि ते सगळेच केशुभाईंना आपला नेता मानत नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे केशुभाईंनी कितीही प्रयत्न केले तरी गुजरातच्या भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात वातावरण निर्माण झालेले नाही. नरेंद्र मोदीच गुजरातेत भाजपाला विजयी करू शकतात हे सर्वांना मान्य आहे. त्यामुळे केशुभाईंच्या कथित बंडामुळे भाजपातल्या नरेंद्र मोदींच्या समर्थनात काही गडबड होईल असे अजिबात शक्य नाही आणि मुळात भाजपामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणी जावे असे काही घडलेले नाही. केशुभाईंनी नरेंद्र मोदींवर टीका करताना राज्यातला पटेल समाज दडपणाखाली जगत आहे, अशी आवई उठवली आहे. पण तिच्यात सुद्धा काही तथ्य नाही. उलट नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणार्या पटेल मंत्र्यांनी केशुभाईंना सवाल केला आहे. पटेल समाज एवढा दडपणाखाली असेल तर या दडपलेल्या समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी केशुभाई पाच वर्षे का शांत बसले, असा टोला त्यांना लगावला आहे.  

 

Leave a Comment