देशात महाक्रांती घडवू: रामदेव बाबांचा इशारा

नवी दिल्ली: काळा पैसा आणि सशक्त लोकपाल कायदा या मुद्द्यांबाबत केंद्र सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही; तोपर्यंत आपण रामलीला मैदानावरच ठाण मांडून बसू आणि आपले आंदोलन अधिक तीव्र केले जाईल; असा इशारा योग गुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे.

शनिवारी आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत बाबांनी केंद्र सरकारला मुदत दिली असून तोपर्यंत आपल्या मागण्यांबाबत ठोस पावले न उचलली गेल्यास आपण देशात महाक्रांती घडवून आणू; असा इशाराही त्यांनी दिला आहे. या पूर्वी बाबांनी केवळ सरकारने आपल्याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन दि. १४ पर्यंत वाढविण्याची तंबी दिली होती. मात्र आता ते आक्रमक इशारा देत आहेत. अर्थात महाक्रांतीची दिशा काय असेल; हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

सध्या सरकारशी आपली चर्चा सुरू नसली तरीही आपले दरवाजे चर्चेसाठी कायम उघडे आहेत; असेही रामदेव बाबांनी स्पष्ट केले. कोणाची प्रतिमा मलीन करणे हा आपल्या आंदोलनाचा हेतू नाही. मात्र सरकारने काळा पैसा आणि लोकपाल विधेयक याबाबत आपली भूमका स्पष्ट केली पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त करून सरकारकडे विदेशात काळा पैसा गुंताविनार्यांच्या नावाची यादी तयार आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी सरकार त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात आहे; असा आरोपही त्यांनी केला.