इन्कमटॅक्स कार्यालयातून ५००० फायली चोरीस

मुंबई दि.११- सरकारी कार्यालयातून फाईल गहाळ झाल्याच्या बातम्या नव्या नाहीत. मात्र मुंबईच्या ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयातून तब्बल पाच हजार फायली चोरीस गेल्याची घटना घडली आहे. तीन इमारतींमध्ये आयकर विभागाची कार्यालये आहेत. पैकी एका इमारतीतील सहाव्या मजल्यावरच्या विभागात ही चोरी झाली असून चोरट्याने खिडकी उघडून आत प्रवेश केला असल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. बांद्रा कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आयकर विभागाला तशा चोर्‍या नव्या नाहीत. मात्र प्रत्यक्ष कार्यालयात घुसून फायली पळविण्यामागे चोराचा हेतू काय असावा हेच लक्षात येत नसल्याचे येथील अधिकारी म्हणाले. चोरीस गेलेल्या फायली मालाड गोरेगांव येथील खासगी कंपन्यांच्या आहेत. पोलिसांनी श्वानपथक आणले हॉते मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही असे समजते. मंगळवारी सकाळी कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला होता. मात्र फायली अन्यत्र हलविल्या असाव्यात असा समज झाल्याने चोरीची तक्रार दिली गेली नव्हती. नंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कर्मचार्‍यांचेही जबाब घेतले आहेत.

दोन वर्षांपूर्वी अज्ञान व्यक्तीने ई सिक्युरिटी सिस्टिम हॅक करून १५ कोटींची रक्कम आयकराचा परतावा म्हणून लंपास केल्याची घटनाही घडली होती असे समजते. कार्यालयाला सुरक्षा रक्षक असून पूर्वीच्या सुरक्षा कंपनीचे कंत्राट संपल्याने नवीन कंपनीशी करार करून १० रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यांनी १ ऑगस्टपासूनच कामाला सुरवात केली होती असे येथील अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment