सातार्‍यात मोकाट कुत्र्यांची कत्तल

सातारा: शहरात मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून बालकाची हत्या केल्यानंतर मोकाट कुत्र्यांना विष घालून मारले जात आहे. शहरातील तब्बल दोनशे कुत्र्यांचा बळी घेण्यात आला आहे. अशा प्रकारे कुत्र्यांना मारणे हा गुन्हा असून महापालिका प्रशासन गुन्हेगारांचा शोध घेत असल्याचे महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.

शहराच्या देवी कॉलनी परिसरात शुक्रवारी १० ते १५ मोकाट कुत्र्यांनी रमाकांत दळवी या पाच वर्षाच्या अनाथ मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. उपचारापूर्वीच रमाकांत मरण पावला.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मोकाट कुत्र्यांना विष घालून मारायला सुरुवात केली आहे. अनेक कुत्र्यांना मारून शहरातील कचरा कुंड्यात टाकण्यात आले; तर अनेक कुत्र्यांना मारून जमिनीत पुरण्यात आले आहे.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या वतीने त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी काही प्राणी मित्रांच्या विरोधामुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.

Leave a Comment