भ्रष्टाचारात भारत सुवर्णपदक मिळवेल- रामदेव बाबा

नवी दिल्ली दि.१० -ऑलिम्पिक स्पर्धेत भ्रष्टाचाराचा समावेश केल्यास भारत निश्चितपणे सुवर्णपदक मिळवू शकेल; अशी टीका योगगुरू रामदेव बाबांनी केली. केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) उपयोग विरोधकांना ब्लॅकमेल करण्यासाठी करण्याऐवजी ही यंत्रणा स्वतंत्र आणि सक्षम केल्यास भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा, महागाई याच्या विरोधात बाबांनी रामलीला मैदानात सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसर्या दिवशी ते बोलत होते.

योगगुरू रामदेवबाबा यांनी सुरू केलेल्या तीन दिवसीय उपोषणाचा आजचा दुसरा दिवस योगासनांनी सुरू झाला. सुरवातीलाच रामदेवबाबांनी आजच्या दिवसाचा अजेंडा देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा असल्याचे सांगितले.

आजच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने रामदेवबाबांचे समर्थक रामलीला मैदानावर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रामदेवबाबांनी भ्रष्टाचारविरोधी या आंदोलनात देशभरातील नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन करतानाच हरिद्वार येथे या आंदोलनासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे व या तीन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी तयार असलेल्यांनी हात वर करण्याचे आवाहन सकाळी सकाळी केले. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळाला असे समजते.

कालच रामदेवबाबानी आपण भ्रष्टाचाराचा विरोध करणाऱ्या सोनिया गांधींसह कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे मात्र राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. उद्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

Leave a Comment