भुजबळ यांनी केली टोलभैरवांची पाठराखण

मुंबई: राज्यात टोलवसुलीचे काम योग्य रितीने सुरू असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘टोलभैरवां’ची पाठराखण केली आहे. महामार्गावर अधिक सुविधा पाहिजे असतील तर टोलला पर्याय नाही; अशी मल्लीनाथी भुजबळ यांनी केली आहे.

राज्यात बेकायदेशीर रितीने टोलवसुली सुरू असल्याचे निदर्शनास आणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालीही टोलविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद देऊन शासनाने काही ठिकाणी टोलवसुली बंदही केली आहे. मात्र भुजबळ यांनी टोलवसुलीचे समर्थनच केले आहे.

राज्यातील बहुतेक महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर उभारण्यात आले आहेत. रस्ते बांधणीवर होणार्‍या खर्चाच्या प्रमाणात टोलवसुली केली जात आहे. महामार्गावर शौचालये, सर्व्हिस रोड अशा सुविधा हव्या असतील तर टोलला पर्याय नाही; असे भुजबळ यांनी सांगितले.

राज्यातील सर्व टोलनाक्यांवर व्यवस्थित वसुली सुरू असून नागरिक टोल भरूनच प्रवास करीत आहेत; असे सांगत भुजबळ यांनी मनसेचे आंदोलन फसल्याचेच निदर्शनाला आणून दिले आहे.

Leave a Comment