अबू जुन्दाल आणि कसाब आमने सामने

मुंबई: अबू जुन्दाल हाच २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा पडद्यामागील सूत्रधार असल्याची माहिती या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याने दिली आहे. अबू जुन्दाल आणि कसाब यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री आर्थर रोड कारागृहात आमने सामने आणले. सुमारे दीड तास हे दहशतवादी एकत्र होते.

इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी असलेल्या जैबुद्दिन अन्सारी उर्फ अबू जुन्दालला मुंबई पोलिसांनी दि. २१ जुलै रोजी दिल्ली पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुंबई हल्ल्याबाबत चौकशी दरम्यान अबूकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा कसाबकडून करून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. अबू जुन्दालाने आपल्याला पाकिस्तानात हिंदी बोलायला शिकविले. तसेच हल्ल्याच्या कामगिरीवर मुंबईला पोहोचल्यावर काय करायचे याच्या सूचना अबूनेच दिल्या; असे कसाबने सांगितले आहे. मुंबईला जाण्यासाठी ९ दहशतवाद्यांना समुद्र किनार्यावर अबू सोडण्यासाठी आल्याचेही कसाबने सांगितले. मात्र अबूने याचा इन्कार केला आहे.

अबू आणि कसाब यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Leave a Comment