स्टडी ’टूर’साठी खासदारांनी केले कोटीचे उड्डाण

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट-जगभरात आलेल्या मंदीमुळे केंद्र सरकारने मंत्री, खासदार आणि अधिकार्‍यांना कमीत कमी खर्च करण्याचे अपिल केले आहे. मात्र, खासदारांनी त्यांच्या या अपिलाची खिल्ली उडविल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या एका माहितीत केंद्राच्या खर्च कमी करण्याच्या अपिलाची पोल खोल झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाषचंद्र अग्रवाल यांनी ही माहिती मिळविली आहे. त्यांच्या माहितीनूसार विविध केंद्रीय मंत्रालयांच्या २५ सदस्यीय समितीने २००९ पासून आतापर्यंत वेगवेगळ्या स्टडी टूरसाठी कोट्यवधी रुपये स्वाहा केले आहेत.

सप्टेंबर २००९ साली तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एक पत्रक काढले होते. हे पत्रक लोकसभा सभापती मीरा कुमार यांना पाठवण्यात आले होते. (छायाचित्रातील पत्रक) त्यात लिहिले होते की, लोक लेखा समिती, आकलन समिती आणि सरकारी कंपन्यांच्या समितीला सोडून सर्व संसदीय बैठका या दिल्लीतच आयोजित केल्या जातील. खर्च कमी करण्याचे निर्देश देताना त्यात लिहिले होती की, प्रवास फारच आवश्यक असेल तर विमान प्रवास बिझनेस क्लास एवजी इकनॉमी क्लासने करावा आणि सरकारी विश्रामगृह किंवा राज्य सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या हॉटेलमध्येच थांबावे.

सरकारी आदेशाचा खासदारांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. खासदार अशा ठिकाणी जात आहेत ज्याचा त्यांच्या समितीशी आणि अभ्यासाशी काडीमात्र संबंध दिसत नाही. खासदारांनी अभ्यास दौर्‍यासाठी निवडलेल्या ठिकाणांची यादीच सुभाषचंद्र यांनी मिळविली आहे. त्यात अंदमान आणि निकोबार बेट, श्रीनगर, लेह, केरळचा समुद्र किनारा, गोवा, लक्षद्विप, डलहौसी, शिमला यांचा समावेश आहे. भाजप नेत्या सुमित्रा महाजन श्रीनगर, जम्मू, अंबाला, चंदिगड, मंगलोर, पलक्कड, कोची आणि तिरुअनंतपूरम येथे ’अभ्यास’ दौरा केला होता. त्यांच्या प्रवासावर एकूण १६,९९,०२२ रुपये खर्च झाला होता.

खासदार सरकारी पैशाने ज्या ठिकाणी गेले आणि जिथे ते मुक्कामी होते त्या ठिकाणांची नावे देखील ’साध्या’ आणि ’कमी खर्चा’च्या चौकटीत न बसणारी आहेत. गोव्यात खासदार ताज विवांता, श्रीनगरमध्ये ललित ग्रँड पॅलेस, मुंबईत ताज महल आणि लीला, चेन्नईत ली मेरीडियन, कोलकातामध्ये ओबेरॉय ग्रँड आणि ताज बंगाल अशा हॉटेलमध्ये थांबले होते. भाजप नेते यशवंत सिन्हा गुवाहाटी, शिलाँग,कोलकाता आणि मुंबई दौर्‍यावर गेले होते.

Leave a Comment