विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा

चेन्नई, ९ ऑगस्ट-केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. विलासराव देशमुख यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टीमची गरज नसल्याचे कळतेय.कृत्रिम श्वसनाऐवजी आता त्यांचा नैसर्गिक श्वासोच्छवास सुरु आहे.

विलासरावांच्या महत्वाच्या चाचण्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. या तपासण्यांच्या रिपोर्टवर उपचाराची दिशा ठरणार आहे.
चेन्नईतील ग्लोबल सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विलासराव देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना उपचारासाठी सोमवारी (ता. ६) येथे तातडीने हलविण्यात आले. यकृत आणि मूत्रपिंडाच्या व्याधीमुळे देशमुख यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट देऊन विलासरावांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार कपिल पाटील, कल्याण काळे यांनी चेन्नईत विलासरावांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन विलासरावांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

विलासरावांच्या स्वास्थ्यासाठी येथे काँग्रेससह विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांत जाऊन महाअभिषेक, पूजा, प्रार्थना सुरू केली आहे. गेले दोन दिवस लातूरकरांचे लक्ष चेन्नईकडेच लागले आहे.

Leave a Comment