रामदेव बाबां करणार तीन दिवस उपोषण

नवी दिल्ली दि. ९ – रामदेव बाबांनी काळा पैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्था परिवर्तनासाठी आज (गुरुवारी) रामलीला मैदानावरुन रणशिंग फुंकले. काळ्या पैशाविरोधात बाबा रामदेव तीन दिवसांच्या उपोषणला बसले आहेत. सकाळपर्यंत आंदोलनाचे स्वरुप निश्चित सांगण्यात आले नव्हते. पण सकाळी ११ वाजता बाबा रामदेव यांनी सार्‍या देशाला  उपास करण्याचे आवाहन कले.

बाबा रामदेव आणि त्यांचे समर्थक पुढचे तीन दिवस  रामलीलावर उपोषण करणार आहेत. उद्यापासून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बाबा रामदेव यांचे कार्यकर्ते लोकांना आवाहन करुन उपास करणार्‍यास सांगणार आहेत.

बाबांनी भाषणाची सुरवात  अण्णा हजारे आणि टीम अण्णांवरच टीका करून केली. १०० टक्के मागण्यांसह लोकपाल मंजूर होणे अशक्य आहे. ९९ टक्के मागण्यांसह लोकपाल चालेल, पण ते सशक्त असावं असे मत व्यक्त करताना अण्णांच्या राजकीय अजेंड्यासोबतही आपण सहमत नसल्याचे बाबांनी सांगितले.

आपले आंदोलन कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात नसल्याचे सांगून बाबांनी पक्षांचा रोष ओढावून घेणे टाळले. बाबा रामदेव यांनी २० हजार लाख कोटींच्या काळ्या पैशाचा हिशेब द्या आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सीबीआयला स्वायत्ता द्यावी अशी मागणी केली.