क्लिनिकल इंजिनियरिंग

क्लिनिकल इंजिनियरींग असा एक विषय नव्याने पुढे आलेला आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असलेल्या अभियांत्रिकी स्वरुपाच्या कामांचे शिक्षण देण्याकरिता ही नवी विद्या शाखा सुरू करण्यात आलेली आहे. तशी ही विद्या शाखा नवी असल्यामुळे तिच्याविषयी अजून समाजातही फारशी जागृती नाही आणि शिक्षण संस्थांनीही हा अभ्यासक्रम फार उत्साहाने सुरू केलेला नाही. देशातल्या फार कमी संस्थांमध्ये तो सुरू आहे. त्याच्या विषयी जागृती कमी असल्यामुळे त्याकडे फारशी मुले वळत नाहीत असे मात्र काही नाही.  कारण सध्या इंजिनिअरींग या शब्दाची जादूच अशी काही निर्माण झालेली आहे आणि चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त असल्यामुळे इंजिनिअरींग अशा शब्दाचा उल्लेख असलेल्या कोणत्याही अभ्यासक्रमाकडे मुलांचा ओढा असतो. तसा याही शाखेकडे आहे.

तमिळनाडूमध्ये तीन संस्थांनी मिळून हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या तीन संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऍन्ड टेक्नॉलॉजी त्रिवेंद्रम तसेच ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर या होत. या तिन्ही संस्था मान्यताप्राप्त असून, त्यांनी क्लिनिकल इंजिनियरींगचा एम.टेक् असा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असे की, तो विद्यार्थ्यांना या तिन्ही संस्थांमध्ये थोडा थोडा काळ जाऊन शिकावा लागतो. हा अभ्यासक्रम अडीच वर्षांचा असून त्यात क्लिनिकल अटॅचमेंट हा विषय ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये शिकावा लागतो. त्याचबरोबर अन्य विषय शिकण्यासाठी अन्य दोन संस्थांत जावे लागते.

या अभ्यासक्रमात बायोमटेरियल्स्, मॉल्युकिलर ऍन्ड सेल बायालॉजी, बायोमेकॅनिक्स्, फंक्शनल अनाटॉमी ऍन्ड फिजिओलॉजी, बायोमेडिकल इमेजिंग सिस्टीम्स्, मेडिकल डिव्हाईस टेक्नॉलॉजी त्याचबरोबर क्रिटीकल केअर इन्स्ट्रुमेंटेंशन इत्यादी विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमातून रुग्णालयात वापरली जाणारी विविध प्रकारची गुंतागुंतीची उपकरणे कशी वापरावीत आणि त्यांची देखभाल कशी करावी याचे शिक्षण दिले जाते.

ही उपकरणे खरेदी करताना सुद्धा अशा पदवीधरांचा सल्ला घेतला जातो. ही सारी उपकरणे अतीशय गुंतागुंतीची आणि संवेदनशील असल्यामुळे त्यांचा सुरक्षित वापर कसा करावा, यावर सातत्याने लक्ष द्यावे लागते. त्यामध्ये काही गडबड झाल्यास त्या साधनाची बदनामी होत नाही, पण संस्थेची मात्र बदनामी होते. याचा अर्थ संस्थेची प्रतिष्ठा या अभियंत्याच्या हातात असते. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्या उमेदवाराकडे बी.ई. किंवा बी.टेक् या पैकी एक पदवी असणे जरुरीचे आहे. अधिक माहितीसाठी www.biotech.iitm.ac.in या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. 

 

Leave a Comment