वाहनचालकांना पार्किंग सुचविणारे मोबाइल अप्लीकेशन

लंडन दि.७- यूकेतील वाहनचालकांना गाड्या पार्क करण्यासाठी कुठे जागा आहे ते सांगणारे तसेच या पार्किंगसाठीचे पैसे मोबाईलवरून भरता येण्याची सोय करून देणारे मोबाईल ऍप्लीकेशन तयार करण्यात आले असून युकेमध्ये अशा ऍप्लीकेशनचा वापर प्रथमच केला जाणार आहे. ही यंत्रणा बुधवारपासून कार्यान्वित केली जाणार असून टप्प्याटप्याने ती पूर्ण ब्रिटन आणि युरोपमध्ये सुरू करण्यात येणार आहे. वेस्टमिन्स्टर सिटी कौन्सिलने या प्रकल्पासाठी टाऊन व सिटी पार्किंग लिमिटेड या कारपार्क फर्मसोबत करार केला असल्याचे सिटी कौन्सिलच्या प्रवक्तांनी सांगितले आहे. या मुळे वाहतूक कोंडी टळण्यास तसेच वाहनचालकांना पार्किंगसाठी जागा शोधण्यात जो वेळ घालवावा लागतो तोही वाचणार आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार वाहनतळांजवळ स्मार्ट सेन्सर्स बसविण्यात आले आहेत तसेच सेन्सर रस्त्यांवरही बसविण्यात आले आहेत. वाहनतळावरील सेन्सर पार्किंगच्या जागेत कार आहे वा नाही, पैसे भरून मिळालेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ ती तिथे आहे काय याची माहिती वाहनचालकांच्या मोबाईलवर देणार आहे. त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे याचीही माहिती हे सेन्सर देणार आहेत. रस्त्यावरील सेन्सर ही माहिती त्यात्या भागातील वाहनचालकांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचविणार आहेत. त्यासाठी वायफायचाही वापर केला जाणार आहे. ज्या वाहनचालकांना रिकाम्या जागी वाहन उभे करायचे आहे त्यांना पार्किंगसाठी आकारण्यात येणारी रक्कम मोबाईलवरूनच भरता येणार आहे. त्याचबरोबर जी वाहने पार्किंगमध्ये मिळालेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ उभी आहेत, त्यांना तसा सिग्नलही मोबाईलवरूनच दिला जाणार आहे. अधिक काळ उभ्या असलेल्या वाहनांना पेनल्टी आकारली जाणार आहे. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

 

Leave a Comment