मारूती मोटर कर्मचार्‍यांसाठी स्वस्त घरे उभारणार

नवी दिल्ली, दि. ७ – वाहनउद्योगातील अग्रणी मारूती मोटर्स इंडिया ही कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी हरियाना आणि गुजराथमध्ये लो कॉस्ट घरे बांधणार असून त्यात १ बेडरूम फ्लॅटसाठी १० लाख तर दोन बेडरूम्ससाठी १५ लाख रूपये कर्मचार्‍यांना भरावे लागणार आहेत. यासंबंधी कंपनीने हरियाणा सरकरला चार महिन्यांपूर्वीच जागा उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क साधला असल्याचे कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. हरियाणा आणि गुजराथ येथे ५० एकर जागेत हे प्रकल्प उभारण्यात येत असून क र्मचार्‍यांना कर्ज मिळावे यासाठी वित्तिय कंपन्यांशीही बोलणी सुरू आहेत.

कंपनीच्या मणेसर येथील प्रकल्पात कांही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात मॅनेजरला जिवंत जाळण्यात आले होते. या कंपनीत कर्मचार्‍यांच्या त्यांना मिळणार्‍या सुविधांबद्दल अनेक तक्रारी असून मणेसर येथील प्रकल्पातच गेल्या वर्षात चारवेळा संप पुकारण्यात आला होता. कंपनीत कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून त्यांना कायम कर्मचार्‍यांच्या तुलनेत तेवढ्याच कामासाठी १/३ पगार दिला जातो. कामाचे तास, कामाच्या वेळा तसेच पगार यासंबंधी कर्मचार्‍यांच्या अनेक तक्रारी असल्याचेही समजते.

या पार्श्वभूमीवर कंपनीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी वरील माहिती देताना सांगितले की, कर्मचार्‍यांचे राहणीमान उंचावण्याची गरज असून, त्यासाठीच कंपनीने त्यांना स्वस्तात घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जमीनीचा शोध सुरू असून हरयाणा सरकारशीही जागेसाठी संपर्क साधण्यात आला आहे. हरयाणात १,५०० तसेच गुजराथमध्ये कंपनी सुरू करणार असलेल्या त्यांच्या नव्या प्रकल्पातील कर्मचार्‍यांसाठी तेथेही १,५०० घरे बांधण्याचा कंपनीचा विचार आहे. कोणासाठीही घर हे महत्त्वाचे असते आणि त्याला कर्मचारीही अपवाद नाहीत. त्यांना घरे मिळाली तर बर्‍याचशा अडचणी सुटू शकणार आहेत व त्यातूनच हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.

मणेसर येथे झालेल्या हिंसाचारानंतर हा प्रकल्प सध्या बंदच असून, त्यामुळे मारूतीचा मार्केट शेअर सात टक्क्यांनी घसरला आहे. त्याचबरोबर उत्पादन ठप्प झाल्याने कंपनीचे २५०० कोटींचे नुकसान झाले आहे.

 

 

Leave a Comment