नवी मुंबईत उद्योगांसाठी तरुणांना कर्ज – गणेश नाईक

नवी मुंबई,दि.८ – नवी मुंबई औद्योगिक पट्ट्याचा विकास करण्याचा मानस आहे. तसेच उद्योगांसाठी व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ९०० पात्र तरुणांना कर्ज देण्यात येईल, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अपारंपरिक ऊर्जामंत्री गणेश नाईक यांनी केले. 

नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती (रोजगार, व्यापारी, उद्योग ) वतीने एरोली सेक्टर-१५ येथील हेगडेभवनमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नाईक बोलत होते. या मेळाव्याची सुरुवात पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

रोजगार मेळाव्यास शालांत परीक्षा ते पदवीधर उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाईक म्हणाले, नवी मुंबईत वाशी येथे २०११ मध्ये अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्यांदा ऐरोलीत असा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात ४० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून पाच हजार बेरोजगार युवकांच्या सहभागी झाले आहेत. जीवनधारामार्फत सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन सर्व सामान्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे मोलाचे कार्य केले जाईल.  आज २५०० हजार तरुणांना या रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी मिळणार आहे.

बेरोजगारांची संख्या शून्य टक्के येत नाही तोपर्यत मेळावे होतच राहतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राथमिक स्वरुपात २५ जणांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कामावर रुजु होण्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले.आमदार संदीप नाईक म्हणाले, शहराच्या विकासात सर्वाचा सहभाग मोलाचा आहे. जीवनधारा रोजगार, व्यापार व उद्योग समितीमार्फत सुरु असणारे उपक्रम समाजाला प्रेरणा देणारे ठरतील.

यावेळी रोजगार मेळाव्याचे आयोजक सचिन अडसूळ, वैभव ज्योष्ठे, दीपक मिसाळ, मैत्रीय रिसबोर्ड यांना पालकमंत्र्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर सोनावणे, अण्णाभाऊ साठे आदी उपस्थित होते.

Leave a Comment