गुरुद्वारा गोळीबार – श्रद्धांजली साठी ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवावे – ओबामा

वॉशिंग्टन, दि. ७ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी  विस्कोन्सिनस्थित गुरुद्वारामधील गोळीबारप्रकरणी हळहळ व्यक्त करतानाच राष्ट्रीय ध्वज दहा ऑगस्टपर्यंत अर्ध्यापर्यंत उतरविण्याचे आदेश आज (मंगळवार) दिले. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवावेत, असे ते म्हणाले.

अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये सध्या वाढ झाली असून, त्या थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात येतील. पत्रकारांशी बोलताना ओबामा म्हणाले, अशा प्रकारची घटना आपल्या सर्वांसाठीच भयावह आहे. अशा प्रकारच्या घटना अतिशय नियमितपणे होत आहेत. या घटनांमागील नेमक्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. ही कारणे लक्षात आल्यानंतर त्यावर नियंत्रण आणणे तितकेच सोपे जाईल.

दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे, असे राज्य विभागाचे प्रवक्ते पॅट्रिक वेनट्रेल यांनी सांगितले.

रविवारी रात्री साडेदहा वाजता शिख समुदाय गुरुद्वारामध्ये एकत्र जमला असताना वेड मायकेल पेज या हल्लेखोराने गुरुद्वारात बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात सात जण ठार, तर २० जण जखमी झाले. एका पोलिस अधिकार्‍याने बंदूकधारी व्यक्तीलाला गोळी झाडून ठार केले, त्यात तेदेखील जखमी झाले.