भारत सर्वांत मोठी विमानवाहू नौका बनविणार

कोची, दि. ८ – कोची जहाज बांधणी गोदीमध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका ’आयएनएस विक्रांत’ची निर्मिती होत आहे. तथापि, या जहाजाच्या जलावतरणाला होत असलेल्या विलंबाचा धडा घेऊन, नौदलाने दुसर्या विमानवाहू नौकेची बांधणी करण्याची तयारी चालविली आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नौकेचे नाव ’आयएनएस विशाल’ ठेवण्यात आले आहे. आपले नाव सार्थ करणारी ही नौका ६५ हजार टन वजनाची असेल. या नौकेची बांधणी पूर्ण झाल्यानंतर, ’आयएनएस विक्रांत’, ’आयएनएस विराट’ किंवा या वर्षाअखेरीस रशियाकडून मिळणार्या ’आयएनएस विक्रमादित्य’ या नौकांच्या तुलनेत ही सर्वात मोठी नौका असेल. 

’आयएनएस विशाल’च्या डिझाईनचे काम नौदलातील आरेखन विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. ही नौका आतापर्यंतच्या सर्व विमानवाहू नौकेपेक्षा ती अत्याधुनिक बनविण्याची महत्त्वाकांक्षा आहे. २०२० ते २५ पर्यंत नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ’आयएनएस विराट’ सेवामुक्त होणार असून, ’आयएनएस विक्रमादित्य’ आणि ’आयएनएस विक्रांत’ या नौका अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनार्यांवर तैनात असतील. ’आयएनएस विशाल’ या नौकेवर सुखोई ३३ आणि मिग ३५ यासारखी महाकाय लढाऊ विमानेही उतरविता येणे शक्य होणार आहे. या नौकेवर ’कॅटापुल्ट’ सारख्या अद्वितीय तांत्रिक करामती बसविण्यात येणार आहे. ’कॅटापुल्ट’ ही एक प्रकारची गलोल असते आणि तिच्या साह्याने विमान हवेत उडविण्यात येते. त्याशिवाय लढाऊ विमानांना हवेतच इंधनाचा पुरवठा करणारे विमानही तैनात करण्यात येणार आहे. 

’आयएनएस विशाल’ प्रकल्प सुमारे दोन अब्ज डॉलरचा असेल. रशियाकडून मिळणार्या एडमिरल गोर्श्कोव्ह या विमानवाहू नौकेपेक्षाही कमी खर्चात ही नौका तयार होणार आहे. गोर्श्कोव्हच्या दुरुस्तीसाठी भारताला २.३४ अब्ज डॉलर खर्च आला आहे. 

Leave a Comment