हैदराबाद, दि. ८ – ’लंडन ऑलिंपिकमध्ये देशासाठी पदक मिळवणे हे माझे उद्दिष्ट्य होते. त्यातही माझे सर्व लक्ष्य सुवर्णपदकाकडे होते. सुवर्ण नाही; पण कांस्य पदक मिळाले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बॅटमिंटनमध्ये पदक मिळवणारी मी पहिली भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.’ अशी प्रतिक्रिया सायना हिने हैदराबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
लंडन ऑलिंपिकमध्ये बॅटमिंटनमध्ये कांस्य पदक प्राप्त करून इतिहास निर्माण करणार्या सायना नेहवाल हिचे मंगळवारी हैदराबाद येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी तिच्यासोबत तिचे प्रशिक्षक आणि माजी बॅटमिंटनपटू पुलेला गोपीचंद, सायनाचे वडील हरवीर उपस्थित होते.
सायनाच्या या यशाबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तिचे अभिनंदन केले. याबद्दल ती म्हणाली की, पुढच्या ऑलिंपिकमध्ये मी देशासाठी निश्चितपणे सुवर्णपदक घेऊन येईन, असे आश्वासन सायनाने पंतप्रधानांना दिले.
ऑलिंपिकमधील पदक मिळवल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न तिला विचारला असता २२ वर्षीय सायना म्हणाली की, ’ऑलिंपिकमधील हे पदक एक टप्पा आहे. अजून असे बरेच टप्पे गाठायचे असल्याने आपण लवकरच सराव पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत करणार आहोत. भविष्यात अजून पदके मिळवायची आहेत’.
पदक मिळवल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, पदक घेण्यासाठी जेव्हा पोडियमवर उभी राहिली तेव्हा मला अश्रू अनावर झाले. इतके वर्ष जी मेहनत मी घेतली होती ती सार्थकी लागली. हे पदक मला पुढील वाटचालीसाठी आणखी पदके मिळवण्यासाठी कायम स्वरुपी प्रेरणा देत राहील. जेव्हा पदक मिळाले तेव्हा मी आणि गोपीचंद सर खूप आनंदित झालो होते.’
’खरे तर मी एक सर्वसामान्य मुलगी आहे. अनेकांनी मला या उंचीवर नेण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये माझे गुरू पी. गोपीचंद याचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे माझे सहकारी या सर्वांची मी मनापासून ॠणी आहे.’ अशा शब्दांत सायनाने मनापासून आभार मानले.