स्वातंत्र्यदिनी राजधानीत बॉम्बस्फोटाची धमकी

जयपूर: पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणा चाचपडत असतानाच राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिनी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल राजस्थानच्या मुख्य सचिवांना आला आहे. याप्रकरणी राजस्थान शासनाने केंद्र शासनाला माहिती दिली असून तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. हे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना घडवून आणणार असल्याचेही मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानचे मुख्य सचिव सी. के. मॅथ्यू यांना आलेल्या या मेलमध्ये; हा नियोजित कट धनंजयकुमार मिश्रा हा २८ वर्षीय युवक अमलात आणणार असून तो मुजहिदीनचा सदस्य आहे; बिहारमधील बक्सर येथे राहणारा धनंजयकुमार अवैध शस्त्र आणि स्फोटक पुरविण्याचा व्यवसाय करतो; सध्या तो दिल्लीत दाखल झाला आहे; बिहारमधील एका माजी मंत्र्यांबरोबर त्याचे जवळचे संबंध आहेत; अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अशाच आशयाचे मेल अन्य काही राज्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही पोहोचल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी तपास यंत्रणांनी कसून तपास सुरू केला आहे.