पावसाळा सुरु होऊन दोन महीने झाले, निम्मा मान्सून संपला आहे. तरी अजूनही पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाअभावी पाणीटंचाई, हिरव्या चाऱ्याअभावी होत असलेली जनावराची हेळसांड त्यातच बँकांनी पिककर्जापोटी दाखविलेला निरुत्साह यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून रुसलेला पाऊस कधी बरसणार याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.
रुसलेला पाऊस कधी बरसणार ?
मराठवाड्यातील आठही जिल्हयात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. ग्रामीण भागातील काही गावांना मार्च महिन्यापासून सुरु झालेला टँकरद्वारे पाणीपुरवठा ऑगस्ट महिना आला तरी करावा लागत आहे. राज्यात अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनाना सरकारने ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील टंचाई परिस्थितीती लक्षात घेऊन सर्वत्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जनावरासाठी चारा डेपोमध्ये चारा उपलब्ध करून देण्यात आला असलातरी या दिल्या जात असलेल्या सर्व सोयी सुविधा अपुऱ्या आहेत.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने दुष्काळाचे थोडेसे चित्र बदलले असले तरी काही गावांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातुलनेत नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. या जिल्ह्यातील पाणीसाठा करणारे प्रकल्प अजून कोरडेच आहेत. त्यामुळे पीक परिस्थिती मात्र अजूनही गंभीर आहे. त्याशिवाय नागरिकांना पाण्यासाठी अजूनही दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मराठवाड्याचे सरासारी वार्षिक पर्जन्यमान ९६० मिलीमीटर इतके असताना आतापर्यंत केवळ २२० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या केवळ २४ टक्के इतकाच पाऊस आतापर्यंत झाला आहे. पावसाची प्रतीक्षा करीत शेतकरी आकशाकडे डोळे लाऊन बसलेले असताना यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा १५ टक्के कमी बरसणार असल्याची भविष्यवाणी हवामान खात्याने केल्याने सर्वसामान्याच्या चिंतेत आणखीन भरच पडली आहे.
नेहमीच दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणखीनच भयावह आहे. बीड जिल्ह्यातील पाणीसाठा करणारे ३१४ प्रकल्प पाण्याअभावी कोरडेठाक पडले असून जिल्ह्यातील पाच मोठ्या प्रकल्पात केवळ एक ते दोन टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात जर पाऊस पडला नाही तर मोठे संकट कोसळणार आहे. बीड जिल्ह्यातील २२९ गावे ९४ वाडी व वस्त्यांना २१२ टँकरद्वारे अजूनही पाणीपुरवठा केला जात आहे. सुरुवातीला मृग नक्षत्रात व नंतर जुलै महिन्यात झालेल्या काही पावसावर विसंबून खरीपाच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्याला मुग व उडदाची पेरणी करता आली नाही त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात कापूस व सोयाबीनचा पेरा अधिक प्रमाणात करण्यात आला आहे. मात्र पुन्हा मध्येच पावसाने दडी मारल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. सध्यस्थित शेतकऱ्यांना जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे गरज असेल त्या ठिकाणी जनावरासाठी चारा डेपो उघडण्यात आले असून त्यासोबतच परजिलह्यात चारा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यालाही मान्सूनच्या या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २५ टक्के इतका पाऊस झाला आहे. त्याचा फटका मात्र ग्रामीण भागातील जनजीवनावर झाला आहे. पावसाने हुलकावणी दिल्याचा परिणाम जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर झाला असून त्यामध्ये कामालीची घट झाली आहे. आतापर्यंत झालेल्या अत्यल्प पावसामुळे २१० प्रकल्पापैकी १३४ प्रकल्प पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. येत्या काही दिवसात समाधनकारक पावसाने हजेरी न लावल्यास जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या १५७ टँकरद्वारे अजूनही पाणीपुरवठा केला जात आहे. १५७ पैकी ९२ टँकरद्वारे उस्मानाबाद शहरला पाणीपुरवठा केला जात आहे. शहरला पाणीपुरवठा केल्या जात असलेल्या रुईभर व तेरणा प्रकल्पात शून्य टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे आगामी पंधरा दिवसानंतर शहराला ४० किलो मीटर अंतरावरील चोरखळी येथील प्रकल्पातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. जिल्ह्यात टंचाईमुळे उघडण्यात आलेल्या चारा डेपोमध्ये चार उपलब्ध नसल्याने जनावरच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीपाची पेरणी ८० टक्यापेक्षा अधिक झाली आहे. तरी सोयाबीन पिकावर मोठ्याप्रमणात आळया पडल्या आहेत. तर उडीद, मुग यांचा पेरा उशिरा करण्यात आल्याने उत्पन्नात कामलीची घट होणार असल्याने बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील बँका पिकाना कर्ज देत नाहीत, तर काही बँकाकडून पीक विमा भरून घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे रुसलेला हा पाऊस कधी बरसणार याची प्रतीक्षा करण्यची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
