मरूस्थळ-राजस्थान-जैसलमेर

वाळवंट म्हणजे हिरवाईविनाचा नुसता ओसाड प्रदेश अशी आपली कल्पना असते आणि ती खरीही आहे. पण निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत कांही ना कांही सौंदर्य असतेच ते फक्त जाणकाराच्या नजरेने टिपता आले पाहिजे. अगाध समुद्राचे सौंदर्य आगळे तसेच उंचचउंच गिरीशिखरे आणि हिमशिखरांचा न्याराच तोरा. पण नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली मऊ लुसलुशीत वाळू, तिचा सोनेरी रंग आणि हलक्याशा वार्‍यानेही त्यावर उमटणारी नाजूक लाटांची नक्षी हा सौंदर्याचा आविष्कारही खास अनुभवण्याचा विषय आहे. अर्थातच त्यासाठी जायला हवे राजस्थानला. आणि त्यातही जैसलमेरला.
Jodhpur1
राजस्थान हा पराक्रमी राजा रजवाड्यांचा प्रांत. आता राजे इतिहासजमा झाले तरी त्यांच्या अनेक कहाण्या मागे राहिल्या आहेत तसेच त्यांचे भले थोरले राजवाडे, त्यांनी वाळवंटात फुलविलेल्या प्रचंड बागा, प्रचंड हवेल्या, आकर्षिक करून घेणारे इथले रंगीबेरंगी बाजार पर्यटकांना भुरळ घालायला सज्ज आहेतच. थारच्या वाळवंटात जोधपूरपासून साधारण ३०० किमीवर असलेले जैसलमेर म्हणजे राजस्थानचा मेरूमणीच.

Jodhpur

या शहराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की यादववंशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासमोर अशी भविष्यवाणी केली होती की यादवांचा वंशज त्रिकुट पर्वतावर राज्य स्थापन करेल. श्रीकृष्णांची ही भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरली ११ व्या शतकात. स्वतःला यादववंशी म्हणविणार्‍या रावल जैसल या भट्टी राजपुताने त्रिकूट पर्वतावर आपली नवी राजधानी वसविली ती म्हणजेच जैसलमेर. हे राजपूत सरंजामी सरदार होते.रेशीम, मसाले यांचा व्यापार करणार्‍यांकडून दिल्ली सिध मार्गावर जैसलमेर येथे जबरदस्त करवसुली करून हे वैभवशाली बनले. आणि त्यांनी अतिशय सुंदर,प्रचंड महाल, हवेल्या आणि नितांतसुंदर जैन मंदिरे बांधून या शहरालाही वैभव मिळवून दिले. जैसलमेरमधेच ८० मीटर उंचीच्या पहाडावर बांधलेला पिवळ्या सँडस्टोनमधील जैसलमेर फोर्ट याची आजही साक्ष देतो आहे. रात्रीच्या अंधारात पिवळ्या दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघणारा हा किल्ला खरोखरीच सुवर्णदुर्ग म्हणावा असाच.

sam-sand-dunes-jaisalmer

या राजवाड्यात आहेत, सुंदर बांधकामांच्या इमारती, बाजार आणि उत्कृष्ट शिल्पकारीने सजलेली सुंदर जैन मंदिरे. वळणावळणाचा दगडी रस्ता साधारणपणे १ किमी लांबीचा आपल्याला किल्यात घेऊन जातो. या किल्यातून आसपासचे जैसलमेर पाहणे हाही आनंदाचा आणि नयनसुखाचा भाग. किल्यातून बाहेर पडल्यावर लागतात १९ वा शतकात बांधलेली नाथमल हवेली. पटुआ हवेली, सालिमसंग हवेली अशा वैशिष्ठपूर्ण हवेल्या. अरूंद गल्लीतून गेल्यावर या हवेल्या आहेत. प्रत्येकीचे वैशिष्ठ्य वेगळे असले तरी त्यावरचे कोरीव काम, सुंदर जाळीदार सज्जे, आतील खोल्या, रंगीबेरंगी काचांनी सजलेली तावदाने सर्वच पाहण्यासारखे. पैकी सालिमसंग हवेली ३०० वर्षे जुनी आणि सुंदर निळ्या रंगाच्या घुमटाकार छतामुळे आणि मोराच्या कोरीवकामामुळे प्रेक्षणीय. किल्ल्यातील जैन तीर्थकरांची मंदिरेही कोरीवकाम नजरेत साठवावे अशीच.

rajasthan-shoes

जैसलमेरपासून साधारण २५ किमीवर आहेत सॅम ड्यून्स आणि ४० किमीवर आहे खुरी हे संपूर्ण वाळवंटातच वसलेले सीमेवरचे शेवटचे गांव. इथे जायचे ते खास वाळवंट पाहायलाच. सूर्यास्ताची शोभा इथून जशी दिसते तशी अन्यत्र दिसत नसावी. या गावात राहण्यासाठी छोट्या छोट्या झोपड्यांचा समुदाय असलेली निवासस्थाने आहेत. सायंकाळी उंटावरून किवा उंटाच्या गाडीतून ड्यून्समध्ये जायचे. शांत बसून सूर्याचा प्रचंड केशरी तप्त गोळा अस्ताला जाताना पाहायचा. रात्री आनंद लुटायचा तो खास राजस्थानी लोककलेचा आणि दाल बाटी, चुरमा, गट्टे का साग या खास राजस्थानी पदार्थांचा आणि रात्र अंधारी असेल तर आकाशातील अगणित नक्षत्रांचा. रात्रीच्या अंधारात हे रत्नखचित तारे काय भुरळ घालतात याचा अनुभव घेतलाच पाहिजे असा.
HOTEL
जैसलमेरला प्रामुख्याने खरेदी करायची ती चामडी जूत्यांची. बाकी विविध हस्तकलेच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, नाजूक कारागिरीच्या वस्तू, कापड, अँटिक्सचाही बाजार मोठा आहे पण येथे परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने हा बाजार कांहीसा महाग आहे. जैसलमेरला राहण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल्सपासून अगदी सामान्य हॉटेल्सपर्यंत सर्व सोयी आहेत तसेच जाण्यायेण्यासाठी रेल्वे, बसची चांगली व्यवस्थाही आहे. येथे जाण्यासाठीचा चांगला मोसम जानेवारी ते मार्चपर्यंतचा पिरीयड.

Leave a Comment