मुंबईत पहिली रोबोटिक हृदयशस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई: जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या युवकावर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या वैद्यकतज्ञांना यश आले आहे.चिरफाड न करता केवळ दोन इंचाचे छिद्र घेऊन करण्यात आलेली ही रोबोटिक शस्त्रक्रिया मुंबईत प्रथमच करण्यात आली आहे.

निलेश या २९ वर्षीय युवकाच्या हृदयाला जन्मत: छिद्र होते. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळले जात असे. तरुण वयात ओपन हार्ट सर्जरी करण्याची या युवकाची मानसिक तयारी नसल्याने रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय ज्येष्ठ हृदयशल्यविशारद डॉ. रमाकांत पांडा आणि डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी घेतला.

रोबोटिक तंत्रज्ञानाने पूर्ण हृदय उघडले जात नाही. केवळ छिद्र घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत नाही आणि रुग्ण लवकर बरा होतो. त्याला दोन दिवसात घरी पाठविता येते; अशी माहिती डॉ. पांडा यांनी दिली.