पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजप नव्हे; रालोआ ठरविणार : गडकरी

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही; असे स्पष्ट करतानाच पंतप्रधानपदाचा उमेदवार एकटा भारतीय जनता पक्ष नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष सामोपचाराने ठरवतील; अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली.

पंतप्रधान पदासाठी मोदी यांच्या नावाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विरोध आहे; याबाबत खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरी यांनी हे स्पष्टीकरण दिले.

भाजप आणि नितीश कुमार यांचा जनता दल (यु) हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे विचार वेगळे असू शकतात; असे मत व्यक्त करून; प्रत्येक बाबतीत जर एकमत असते तर पक्ष वेगळे कसे राहिले असते; असा सवाल गडकरी यांनी केला. मात्र हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा याबाबत आघाडीचे घटक पक्ष एकत्र बसून चर्चेने निर्णय घेतील; असे गडकरी म्हणाले.

नितीश कुमार कधीही काँग्रेसबरोबर जाणार नाहीत; असा दावा करून गडकरी म्हणाले की नितीश कुमार हे राम मनोहर लोहियांचे अनुयायी आहेत. लोहिया यांनी नेहेमीच काँग्रेसला विरोध केला आहे.

Leave a Comment