पुणे: जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पुण्याला भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र या प्रकरणाबाबत तपास पूर्ण झाल्याखेरीज आपण भाष्य करणार नाही; असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही पुण्याला भेट दिली. गृहराज्यमंत्री सतेज पाटीलही त्यांच्याबरोबर होते.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सह आयुक्त शहाजी सोळुंके उपस्थित होते.
पुण्यातील स्फोटांबाबत अनेक शक्यतांवर विचार करून तपास सुरू असून तपास झाल्यावरच आपण याबाबत बोलू; असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. शहरातील सध्या असलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्यांची देखभाल आणि नवे कॅमेरे बसविण्याबाबत आयुक्तांना सूचना केल्याचेही ते म्हणाले.
माध्यमांनी तपासात अडथळा येईल असे वार्तांकन करू नये; असे आवाहन शिंदे यांनी केले.