स्पेनमध्ये अल कायदाच्या तीन संशयितांना अटक

अल कायदा संघटनेची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी कार्यरत असलेल्या स्पॅनिश सुरक्षा दलाने गुरूवारी तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडच्या तपासात स्फोटकेही मिळाली असल्याचे समजते. अमेरिकेत अथवा ब्रिटनवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा उद्योग असावा अशी शक्यता सुरक्षा अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. तीन पैकी एक तुर्की असून अन्य दोघे रशियन चेचेन ओरिजीनचे आहेत.

इंटरर्नल मंत्री जॉर्ज फर्नांडेझ डायझ यांनी यासंबंधात दिलेल्या माहितीनुसार हे तिघे बसमधून फ्रान्सकडे जात होते. सीमेवर सुरक्षा दलांनी बस अडवून प्रवाशांची तपासणी केली तेव्हा या तिघांनी प्रतिकार केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांपैकी एक ज्या जागेत राहात होता तेथे एक बस उध्वस्त होऊ शकेल इतकी स्फोटके सापडली आहेत. या तिघांचा अमेरिकन स्पॅनिश संयुक्त नाविक बेस किंवा जिब्राल्टर येथील ब्रिटीश वसाहतीवर हल्ला करण्याचा उद्देश असावा असा अंदाज असून ते फ्रान्सकडे जात होते म्हणजे कदाचित फ्रान्समध्येही धमाका करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असे सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या लष्करे तैयबाशी हे संबंधित असावेत असाही अंदाज असून किमान यातील दोघांना पाकिस्तान किवा अफगाणिस्तानात प्रशिक्षणही दिले गेले असावे असा तर्कही व्यक्त करण्यात आला आहे. या तिघांनाही ड्रोन रिमोट ची पूर्ण माहिती आहे शिवाय स्फोटके तयार करणे, कार बॉम्ब आणि शूटिंगचेही पूर्ण ज्ञान असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Comment