भारत पाक सीमेवर आणखीही भुयारे असण्याची शक्यता

जम्मू दि.३- जम्मूतील सांबा जिल्हयात भारतपाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाला सापडलेल्या भूमिगत बोगद्यामुळे सीमा सुरक्षा दल वरीष्ठ चिंतेत पडले असून अशी आणखी कितीतरी भुयारी खणली गेली असतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. या भुयारांचा वापर प्रामुख्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी तसेच जम्मू काश्मीर मध्ये शस्त्रे पाठविण्यासाठी केला जात असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक यु.के.बन्सल यांनी सीमेवर आढळलेल्या भुयाराची समक्ष पाहणी केली. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की अशी अनेक भुयारी खोदली गेली असण्याची दाट शक्यता आहेच पण ती शोधायची कशी हीच खरी अडचण आहे. आपल्या सरकारने पाकिस्तानच्या या कृत्याचा कडक निषेध करून त्यांना सक्त भाषेत दटावण्याची गरज आहे. अन्यथा या दोन देशात जे परस्पर विश्वासाचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,त्याला कायमची खीळ बसण्याची शक्यता आहे. भुयार आढळणे ही बाब यासाठी घातकच म्हणावी लागेल. सीमाभागातला हा चारशे मीटरचा बोगदा पावसामुळे सीमेवरील कुंपणानजीकची भिंत खचल्याने योगायोगानेच सापडला आहे. अर्थात अशी आणखी भुयारे असतीलच असे गृहित धरूनच सीमा सुरक्षा दल अधिक सावधगिरी बाळगेल.

दोन आठवड्यावर आलेल्या स्वातंत्र्यदिनाचा विचार करता अशा भुयारांचा वापर शस्त्रे आणि दहशतवादी घुसविण्यासाठी केला गेलेला असू शकतो अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment