पेप्सिको, युनिलिव्हरशी महाराष्ट्र शासनाचा सहकार्य करार

मुंबई दि.३ – कृषी विकासासाठी शासनाला उपलब्ध झालेल्या विविध संस्थांच्या अनुदानाचा अधिक चांगला वापर होऊन शेतकर्‍यांचा विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पेप्सिको, हिदुस्थान युनिलिव्हर तसेच जैन इरिगेशन या खासगी कंपन्यांबरोबर सहकार्याचा करार नुकताच केला असून त्यात बटाटा, कांदा, टोमॅटो या पिकांचा सुरवातील समावेश करण्यात आला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या प्रकल्पाचाच हा एक भाग आहे असे सांगण्यात येत असून त्यासाठी आठ कमोडिटी ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत. त्याचा मुख्य उद्देश अॅग्री व्हॅल्यू चेनचा विकास करणे हा असून पेप्सिको आणि जैन इरिगेशन टोमॅटो, बटाटा आणि कांदा यांच्या साठी अनुक्रमे प्रमुख भागीदार आहेत. उपलब्ध अनुदानाचा यथायोग्य वापर करून या प्रयोगातून चांगले निकाल हाती येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडे कृ षी क्षेत्र विकासासाठी कोट्यावधींची अनुदाने येत असून खासगी सहकार्यातून या अनुदानांचा अधिक चांगला वापर करण्याचे शासनाने ठरविले असल्याचे राज्य कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांनी सांगितले. शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या खासगी संस्थांना या अनुदानातून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र हॉर्टीकल्चर बोर्डाचे प्रकल्प समन्वयक आबा हराळ अधिक माहिती देताना म्हणाले की खासगी कंपन्या शेतकर्‍यांना रोपांच्या संरक्षणासाठीची किटस पुरवितील तसेच शेतकर्‍यांना प्रशिक्षण तसेच स्वस्तात बियाणे देतील आणि तांत्रिक सहकार्यही करतील. सरकार ठिबक सिचन, क्रेट, फवारणी पंप यासाठी अनुदाने देईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली शासनाला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, नॅशनल प्रोग्रॅम ऑन मायक्रो इरिगेशन अशा अनेक योजनांखाली अनुदान मिळत आहे. त्यातून सरकारने तीन खासगी कंपन्यांशी सहकार्य करार केले आहेत.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष डी.ए.कुलकर्णी यांनी या योजनेतून शेतकर्‍यांना चांगला फायदा होण्याची संधी असल्याचे सांगितले. विविध योजनांच्या माहितीसाठी शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत असे सांगून ते म्हणाले की त्यांच्या कंपनीने कांदा प्रकल्प हाती घेतला असून नागपूर, धुळे, जळगांव, नंदूरबार, औरंगाबाद,बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील  शेतकर्‍यांच्या एकूण २५०० एकर जमिनीवर कांदा लागवड करण्यात येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरने नाशिक जिल्ह्यातील ५०० शेतकर्‍यांना या उपक्रमात सामील करून घेतले असून तेथे द्राक्षे व वाईन बरोबरच १ हजार हेक्टर जमिनीवर टोमॅटो उत्पादन घेतले जाणार आहे. पेप्सिकोने राज्यातील ३ हजार एकर जमिनीवर बटाटा उत्पादक शेतकर्‍यांना सामील करून घेतले असून सातारा, सांगली जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचाही यात समावेश आहे. यंदाच्या खरीपात बटाटा व टोमॅटो प्रकल्प सुरू होत आहेत तर कांदा प्रकल्प रब्बी हंगामापासून सुरू होणार आहे.

Leave a Comment