एसबीआयच्या वाहन आणि गृह कर्जदारांना मोठा दिलासा

नवी दिल्ली,दि.३ -रिझर्व्ह बँकेने नुकत्याच पतआढाव्यात वैधानिक रोखता प्रमाणात (एसएलआर) केलेल्या कपातीचे स्वागत करताना भारतीय स्टेट बँकेने वाहन आणि गृह कर्जाचे व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. यामुळे वाहन व गृह कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून, हे नवे दर ७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच घेतलेल्या पतआढाव्याकडून बँकांना रोख राखीवता प्रमाण (सीआरआर)मध्ये किमान अर्ध्या टक्क्याच्या कपातीची अपेक्षा होती. मात्र प्रमुख व्याजदरात कोणताही बदल न करता बँकांना ठेवींपैकी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवाव्या लागणार्‍या प्रमाणात म्हणजेच ‘एसएलआर’चा दर २४ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आणला होता. यामुळे बँकांना अतिरिक्त ६८ हजार कोटींची रक्कम यात एसबीआयकडे १०,००० कोटींचा पैसा उपलब्ध होणार. त्याचप्रमाणे निर्यात पुनर्वित्त पुरवठ्याच्या दरातील कपातीमुळे ६,५०० कोटी अधिक मिळणार असल्याने किरकोळ कर्जावरील व्याजदर कपात होऊ शकेल, असे बँकेचे अध्यक्ष चौधरी यांनी म्हटले.

या पार्श्वभूमीवर एसबीआयने आपल्या ग्राहकांना फायदा देताना ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी करून १०.२५ टक्क्यांवर खाली आणले असल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. तसेच ३० लाख ते ७५ लाखांच्या आतील गृहकर्जावरील ०.३५ टक्क्याने कमी करून १०.४० टक्के करण्यात आले आहेत. एसबीआयचा किमान कर्ज दर १० टक्के आहे. या दरापेक्षा कमी दराने बँक कर्ज देऊ शकत नाही. दरम्यान, वाहन खरेदी करू इच्छिणार्‍या ग्राहकांनाही बँकेने खूषखबर देताना सात वर्ष कालावधीच्या वाहनकर्ज दर ०.५० टक्क्यांनी कमी करून १०.७५ टक्क्यांवर आणला आहे.

मासिक कर्जफेडीचा भार कमी होणार
एसबीआयने व्याजदरांत केलेल्या कपातीमुळे कर्जदारांवरील मासिक कर्जहप्त्यांचा भार कमी होणार आहे. प्रत्येक १ लाखाच्या कर्ज रकमेवर बँकेच्या ग्राहकांना १६९९ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. सध्या हा हप्ता १७२५ रुपये असा आहे. एक लाखाच्या कर्जफेडीवर वर्षाला ३१२ रुपये वाचणार आहे.

Leave a Comment