स्मार्टफोन क्षेत्रात भारतीय कंपन्यांचीही एन्ट्री

सॅमसंग, अॅपल या सारख्या बलाढ्य परदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता भारतीय मोबाईल कंपन्यांनीही स्मार्टफोन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून अनेक नामवंत कंपन्यांचे स्मार्टफोन सप्टेंबर ते डिसेंबर या काळात भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत. परदेशी कंपन्यांच्या इतक्याच चांगल्या दर्जाचे पण किमतीत मात्र निम्म्यापेक्षा कमी असणार्‍या या स्मार्टफोनना भारतीय ग्राहक चांगला प्रतिसाद देतील अशी खात्री या कंपन्यानी व्यक्त केली आहे.

परदेशी कंपन्यांचे स्मार्टफोन लोकप्रिय होत आहेत हे खरे असले तरी या लोकप्रियतेचा फायदा घेऊन या कंपन्या स्मार्टफोनच्या किमतीही वाढवू लागल्या आहेत. लावा इंटरनॅशनल चे व्यवस्थापकीय संचालक एस.एन.रॉय यासंबंधी बोलताना म्हणाले की परदेशी कंपन्यांचे महागडे स्मार्टफोन घेण्यापेक्षा भारतीय ग्राहक देशी कंपन्यांना प्राधान्य देताना दिसत आहेत. आपल्या कंपन्यांनीही त्यांचा ब्रँड मजबूत बनविण्यात चांगलीच आघाडी घेतली आहे. भारतात स्मार्टफोनला ग्राहकांकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून देशी कंपन्या आपली उत्पादने विविध प्रकारात भारतीय बाजारपेठेत उतरविण्यास आता सज्ज असून येत्या महिन्या दोन महिन्यात भारतीय ग्राहकांना प्रचंड मोठी व्हरायटी उपलब्ध होऊ शकणार आहे. भारतीय कंपन्यांचे स्मार्टफोन सात ते बारा हजार रूपयांपर्यंत उपलब्ध होणार आहेत.

कार्बन मोबाईलचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन यांनी त्यांच्या स्मार्टफोन श्रेणीची जोरदार विक्री होत असल्याचे सांगितले. हा प्रतिसाद पाहून कंपनी विविध श्रेणीतील स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचे सांगून ते म्हणाले की जून २०१२ मध्ये कंपनीने ९० हजार युनिटस विकली असून सप्टेंबरपर्यंत अडीच लाख युनिट विकली जातील असे दिसत आहे. जाणकारांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की भारतीय कंपन्यांचे स्मार्टफोन भारतीय बाजारात रूळले की या कंपन्या टॅब्लेटही बाजारात उतरविण्याचा विचार करतील. स्मार्टफोन श्रेणीला असलेल्या मागणीमुळे सध्या भारतीय कंपन्यांचे सरासरी विक्री मूल्य वाढल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment