मोदींच्या ऑफरला जुही चावलाचा नम्र नकार

मुंबई दि.२ – कांही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला राजकारणात येणार असल्याची बातमी आली होती. त्याला पुष्टी देणारी घटना नुकतीच घडली आहे. गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुही चावलाला गुजराथच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्याची ऑफर दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र असेही समजते की जुहीने सध्या तरी राजकारण आपला प्रांत नसल्याचे सांगून ही विनंती नम्रपणे नाकारली आहे. अर्थात राजकारणात आणि बॉलिवूडमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कदाचित जुहीचा नकार होकारातही बदलला जाऊ शकतो असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

राजकारणात चित्रपट नट नट्यांचा सहभाग हा आता बहुतेक सर्व जगात रूळलेला ट्रेंड बनला आहे. भारतातही धर्मेंद्र, हेमामालिनी, जयाप्रदा, जया भादुरी, गोविंदा , सुनील दत्त,शत्रुघ्न सिन्हा, चिरंजीवी या लोकप्रिय कलाकारांनी आपला चांगला जम बसविला आहे. सर्वच राजकीय पक्ष या कलाकारांना आपल्या पक्षांची उमेदवारी देण्यासाठी चढाओढ करत असतात. कांही वर्षांपूर्वी तर रामायण या गाजलेला मालिकेतील रावण व सीता भाजपकडून आणि राम काँग्रेसकडून निवडून आले होते. आता या यादीत जुहीचीही भर पडते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

नरेंद्र मोदी यांची जुहीने काँग्रेसचे अर्जुन मोडवडिया यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. तशी विनंती जुहीला करण्यातही आली आहे. मात्र दोन मुलांची जबाबदारी, घराची जबाबदारी आणि राजकारणाची आवड नसल्याने जुहीने हे काम आपल्याला झेपणार नाही असे सांगितले आहे. बॉलिवूड मध्ये आपण समाधानी आहोत असेही जुही म्हणाली आहे. सध्या ती कृष्णा आणि कंस या अॅनिमेटेड चित्रपटात व्यग्र असून या चित्रपटातील यशोदेसाठी ती आवाज देत आहे. अर्थात गुजराथच्या निवडणूका अजून बर्‍यापैकी लांब आहेत.  जुहीचा नकार होकारात बदलावा यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment