न्यूरोबायालॉजी

brain

वैद्यकीय शिक्षणाचे क्षेत्र म्हटले तर व्यापक आहे आणि म्हटले तर मर्यादित आहे. त्याच्या व्याप्तीचा विचार करायला लागलो तर या शास्त्रामध्ये किती सूक्ष्मपणे अभ्यास सुरू आहे हे बघून अचंबा वाटतो. वैद्यकीय शास्त्रामध्ये आता केवळ मेंदूचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा निर्माण झालेली आहे, एवढे म्हणून भागत नाही. त्या मेंदूच्या शास्त्रात सुद्धा आणखी काही शाखा निर्माण झालेल्या आहेत. मेंदूमुळे पूर्ण शरीराचे नियंत्रण होते. त्यामुळे आता मेंदूशी संबंधित न्यूरोबायालॉजी हा विषय विकसित झाला आहे. सकृतदर्शनी मेंदूचा अभ्यास आणि न्यूरोबायालॉजीचा अभ्यास हा एकच असेल असे वाटू शकते. परंतु या दोन्हीत एक मोठा फरक आहे.

मेंदूच्या अभ्यासामध्ये मेंदू, मेंदूची रचना आणि त्याचे कार्य यावर लक्ष केंद्रित केलेले असते. परंतु न्यूरोबायालॉजीमध्ये हा मेंदू शरीराचे नियंत्रण कसे करतो यावर भर दिला जातो. मेंदू आणि शरीराचे विविध अवयव, त्याचबरोबर त्यांचा संबंध तसेच मेंदूची शरीराची नियंत्रण करण्याची यंत्रणा या गोष्टींवर या शास्त्रात भर दिलेला असतो. त्यामध्ये माणसाच्या शरीराचे विविध अवयव एका विशिष्ट पद्धतीनेच निकामी का होतात, त्याचे वागणे का बदलते अशा विषयांचा अभ्यास केला जात असतो. आपल्या शरीरातल्या काही क्रियांवर आपले नियंत्रण नसते. त्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. पण त्या नेमक्या तशाच का घडतात याचा अभ्यास न्यूरोबायालॉजीस्ट करत असतो. त्यातूनच या न्यूरोबायालॉजीच्या विविध शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात कॅन्सरचे संशोधन करणारी शाखा फार महत्वाची आहे. न्यूरोबायालॉजीशी संबंधित क्षेत्रामध्ये अनेक विषय येतात ज्यामध्ये शरीरातल्या विशिष्ट क्रियांचा समीक्षणात्मक अभ्यास केला जातो.

विशेषत: आपल्या शरीरातल्या काही क्रिया आनुवंशिकतेने निश्‍चित होत असतात. त्यामागची संगती लावणे हे न्यूरोबायालॉजीतील जेनेटिकल बायालॉजी या शाखेचे काम आहे. अशा अभ्यासाचे संशोधन करून त्यात नवी भर टाकण्याच्या हेतूने इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेन (इब्रो) ही संघटना स्थापन करण्यात आली आहे आणि फ्रान्समध्ये मुख्यालय असलेल्या या संघटनेकडून न्यूरोबायालॉजीच्या संशोधनाचा समन्वय साधला जात असतो. या शाखेचा अभ्यास करण्यासाठी काही पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवार हा वैद्यकीय पदवीधर असणे आवश्यक आहे. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरो सायन्सेस् ही संस्था इब्रोची सहयोगी संस्था आहे. या संस्थेकडून या क्षेत्रातल्या प्रगत अभ्यासक्रमांची माहिती मिळविता येते. तिचा ई-मेल ऍड्रेस [email protected] असा आहे. या संबंधात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍन्ड न्यूरोसायन्सेस ई-मेल ऍड्रेस www.nimhans. kar.nic.in असा आहे.

 

 

Leave a Comment