सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस उत्तर भारतातला वीज पुरवठा एकदम ठप्प झाला आणि आपल्या देशात अशा संकट काळात कसल्याच पर्यायी समर्थ व्यवस्था कशा उपलब्ध नसतात याचे विदारक दर्शन घडले. आधी सोमवारी उत्तर भारतात पंधरा तास वीज पुरवठा बंद झाला. नॉर्दन ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे केन्द्रीय उर्जा खात्यातून सांगण्यात आले. या ग्रीडमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होतो. या राज्यात सोमवारी अंधार पसरला होता. ही स्थिती कशी बशी सुधारण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात ईस्टर्न म्हणजे पूर्व भागातल्या ग्रीडमधून वीज घेण्यात आली. कारण नाही तर पंतप्रधानांचे घर आणि कार्यालयच अंधारात बुडून गेले असते. दरम्यान उत्तर भारतातल्या ग्रीडमध्ये काही म्हणावी तशी सुधारणा न झाल्याने तिथले संकट तसेच राहिले आणि मंगळवारी उत्तर बरोबरच पूर्व भागही अंधारात बुडाला. मंगळवारी देशातली छोटी आणि मोठी मिळून २० राज्ये अंधारात बुडाली.
विजेचे भार नियमन किंवा काही प्रमाणात वीज कपात हा प्रकार आता सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. आपल्या जीवनातल्या अनेक गरजा आता विजेवर अवलंबून आहेत. त्यामुळे वीज पुरवठा काही काळ खंडित होणे किंवा काही प्रमाणात कपात होणे असा काही प्रकार घडला की आपण आपल्या काही सवयी बदलतो. काही सेवा स्थगित करतो. कमी विजेत जगायला शिकतो पण, वीज पुरवठा पंधरा तास पूर्ण बंद झाला की पाणी पुरवठा, रेल्वे, अशा सगळ्याच सेवा बाधित होतात. उत्तर ग्रीडमध्ये देशाची राजधानी आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड अशी औद्योगिक राज्ये आहेत.तिथे अनेक शहरे आहेत. त्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे विजेवर अवलंबून असतो. वीज अशी प्रदीर्घ काळ बंद पडली की या शहरांच्या नाड्या बंद पडतात. तशा त्या दोन दिवस बंद पडल्या. पाणी पुरवठा बंद पडला तर तो स्थानिक प्रश्न होतो पण विजेच्या अभावी रेल्वे सेवा विस्कळीत झाली तर तिचे परिणाम पूर्ण देशाला भोगावे लागतात. काल तसाच प्रकार घडला. उत्तर भारताच्या आग्रा, झांशी, अलाहाबाद, मोरादाबाद, दिल्ली, अंबाला आणि कोटा या सात विभागातल्या ३०० गाड्यांची सेवा बंद पडली.
या गाड्या देशभर जाणार्या होत्या त्यामुळे जवळपास निम्म्या देशाची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अनेक गाड्या उशिराने धावायला लागल्या. काही गाड्या कायमच्या रद्द करून पूर्ण वेळापत्रक नव्याने सुरू करण्यात आले. ही सारी दुरुस्ती झाल्यानंतर रेल्वेचे वेळापत्रक रुळावर आले; पण या बदलाने लाखो प्रवाशांची गैरसोय झाली. पण टाईम टेबल वळणावर आले आणि सारे काही ठीक होत आहे असे दिसायला लागले पण मंगळवारी हे ग्रीड तर दुसर्यांदा बंद पडलेच पण, पूर्व ग्रीडही ठप्प झाले. परिणामी पूर्व भारतातल्या ओरिसा आणि प. बंगाल या राज्यातली रेल्वे सेवा विस्कळीत झाली. वीज पुरवठा बंद होण्याचा हा गेल्या २० वर्षातला सर्वात गंभीर प्रकार आहे. अशी वेळ का येते ? ग्रीडमध्ये अनेक राज्ये असतात आणि त्यातल्या एका राज्याने ठरवून दिल्यापेक्षा अधिक वीज ओढून घेतली की ग्रीडमध्ये दोष निर्माण होतो. कारण एकाच राज्याने वीज ओढून घेतली की अनेक राज्यात ती बंद पडायला लागते. मात्र कालच्या ग्रीड फेल्युअरचा प्रकार असा नव्हता. काल झालेला प्रकार आग्रा शहराजवळ झालेल्या दोषामुळे निर्माण झाला होता. आता या संकटाचे गांभीर्य वाढले आहे कारण पूर्वेतही असाच प्रकार घडला आहे.
ख़रा प्रकार गंभीर असण्याचे कारण असे की उत्तरेच्या ग्रीडमध्ये काही बिघाड झाला की, पूर्वेच्या ग्रीड मधून काही प्रमाणात वीज घेऊन दिल्लीतली काही अतीमहत्त्वाची कामे केली जातात. सोमवारी उत्तरेतले ग्रीड बंद पडताच आधी मेट्रो रेल्वे बंद पडली, महत्त्वाची रुग्णालये बंद पडली आणि रस्त्यावरचे सिग्नल्स बंद पडून सारेच व्यवहार बंद पडण्याची पाळी आली. दिल्लीची दररोजची गरज आहे ४ हजार मेगावॉट पण सोमवारी दिल्लीला पुरवठा होत होता तो केवळ ३८ मेगावॉटचा. यावरून दिल्लीत किती आणीबाणी निर्माण झाली असेल याचा अंदाज येतो. या वर उपाय म्हणून पूर्वेच्या ग्रीडमधून वीज घेऊन काम भागवले गेले पण मंगळवारी तर पूर्वेतलीही वीज बंद पडली. यावरून उत्तर भारत आणि पूर्व भारत अशा दोन्ही भागातल्या जवळपास २० राज्यांचे व्यवहार किती विस्कळीत झाले असतील याचा अंदाज येतो. आपला देश महाशक्ती होणार आहे पण वीज ही मूलभूत सोय नीट पुरवण्याचीही आपली क्षमता नाही. पाणी आणि वीज पुरेशा क्षमतेने पुरवली नाही तर सामान्य माणसाचे जीवन सुकर कसे होईल ? प्रगत देशात असा प्रकार कधीच घडत नाही. आपल्या देशात विजेची मागणी वाढत आहे पण मागणीएवढी वीज निर्मिती करण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. त्याचे हे परिणाम आहेत.