सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ‘पद्मभूषण’ परत करू: अण्णांचा इशारा

नवी दिल्ली: लोकपालाच्या मागणीसाठी टीम अण्णाने जंतरमंतर मैदानावर सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे सरकारचे धोरण कायम राहणार असेल तर आपण ‘पद्मभूषण’ हा सन्माननीय शासकीय पुरस्कार परत करू; असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सरकार मात्र बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याच्या विचारात आहे; अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनीही तसे संकेत दिले.

सरकार कोणालाही मरण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळे विनंती करूनही टीम अण्णा उपोषण सोडून चर्चेला पुढे येणार नसले तर सरकारने हस्तक्षेप करणे अपरिहार्य आहे; असे सूचक विधान दिग्विजय सिंह यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. चर्चेने कोणत्याही समस्येतून मार्ग निघतो असा आपला विश्वास आहे. मात्र धमक्या देऊन चर्चा होत नसते; असा टोलाही त्यांनी लगावला. टीम अण्णाने उपोषण सोडल्यासच चर्चेचा मार्ग खुला होऊ शकतो; असे दिग्विजय सिंह म्हणाले.

प्रत्यक्षात अण्णा आणि टीम अण्णा मात्र उपोषण सुरू ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची प्रकृती अतिशय खालावलेली असूनही रुग्णालयात दाखल होण्यास त्यांनी ठाम नकार दिला आहे. दिल्ली पोलिसांनी टीम अण्णाला पाठींबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या १७ समर्थकांना रुग्णालयात दाखल केले असून केजरीवाल आणि राय यांनी देखील रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती करणारे पत्र दिले आहे. मात्र टीम अण्णा आपल्या निर्धारावर ठाम राहिल्यास त्यांना अटक करून रुग्णालयात नेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.